“एक दबंग मित्र आमच्या वाट्याला आला आहे”; शहाजी बापू पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. ज्या अजित पवार यांच्यावर टीका करून शिंदे गट वेगळा झाला, त्याच अजित पवारांसोबत सत्तेत बसावे लागणार असल्याबाबत शिंदे गटावर टीका करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.

काय झाडी, काय डोंगर, या डायलॉगमुळे अवघ्या देशभारत प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. अजित पवारांमुळे जे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले, आता त्याच आमदारांना अजित पवारांकडून निधी घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ‘सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली, अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे’, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केले.

एक दबंग मित्र आमच्या वाट्याला आला आहे

शहाजीबापू पाटील म्हणाले की, आमच्या वाट्याला कोणतीही सासू आली नाही. एक दबंग मित्र आमच्या वाट्याला आला आहे. अजित पवार महायुतीत सामील झाल्याने निश्चितपणे आमची राजकीय ताकद वाढली आहे, असा विश्वास शहाजीबापू यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हेही गेले होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मानाचे स्थान देत पहिल्या रांगेत उभे केल्याचा फोटो समोर आला होता. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी आपल्याच रांगेत बसविले. एनडीएच्या बैठकीत शिवसेना जुना मित्र असला तरी नव्याने दाखल झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महत्व देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!