
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेच्या इतिहासात एका मुख्याधिकाऱ्याला अत्यंत भव्य आणि प्रेमळ निरोप समारंभ देण्यात आला. तत्कालीन मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात कामाच्या आणि स्वभावाच्या जोरावर मिळवलेल्या लोकप्रियतेमुळे, पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन अनोख्या पद्धतीने केले होते. श्री. निखिल मोरे यांचा निरोप समारंभ आणि नूतन मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांचे स्वागत, असा हा दुहेरी सोहळा एकाच धाग्यात गुंफण्यात आला होता, ज्यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. श्री. मोरे यांनी आपल्या मैत्रीपूर्ण आणि आत्मीयतेच्या नात्याने कर्मचारी वर्गात एक विशेष स्थान निर्माण केले होते, जे त्यांच्या निरोपावेळी स्पष्टपणे दिसून आले.
आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात श्री. मोरे यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. पालखी सोहळ्याचे यशस्वी नियोजन, बाणगंगा नदीच्या पूरस्थितीचे कुशल व्यवस्थापन, पालिकेच्या शाळांसाठी ‘टाटा कमिन्स सीएसआर’ निधीतून सुविधा मिळवण्याचे प्रयत्न आणि स्वातंत्र्यदिनी शहरात प्रथमच तिरंगा रोषणाई करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
केवळ प्रशासकीय कामकाजच नव्हे, तर त्यांच्यातील माणूसही अनेकदा दिसला. एका चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याला निरोपाच्या दिवशी आपल्या खुर्चीवर बसवून सन्मान देण्याच्या त्यांच्या कृतीचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले. तसेच, आपल्या शेवटच्या दिवशी चार जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देऊन त्यांनी अनेकांना मोठा आधार दिला. त्यांच्या याच कार्यामुळे शहरातील अनेक नागरिक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तेही त्यांना निरोप देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.