जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा अजिंक्य योद्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २९: आपल्याकडे सुगंध आहे हे चंदनाला वनस्पतींचा मेळावा भरवून जाहीर करावं लागत नाही. चंदनाचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो. जे अंतर्यामी असतं ते कृतीतून धावतं. सातारा- जावली मतदारसंघासाठी चंदनापरी देह झिजवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आणि आपुलकी तसेच प्रत्येक आव्हानाला धाडसाने तोंड देण्याची वृत्ती यामुळे सातारा आणि जावली तालुक्यांच्या सर्वांगिण विकासासह अजिंक्य उद्योग समुहाला उभारी देण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले. आपल्या अष्टपैलू कामगिरीने राजकारणात एक आदर्श घालून दिला. राजघराण्याचा समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवून सातारा आणि जावली तालुक्यात विकासगंगा कायम प्रवाहित ठेवत मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साध्य केला. अनेक सहकारी संस्थांना उर्जितावस्था देत अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उच्च शिखरावर विराजमान करुन हजारो हातांना काम आणि तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचे दाम मिळवून देत आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा समाजसेवेचा वारसा अखंडीत ठेवला आहे. विकासकामात राजकारण न आणता, पक्षीय भेदभावास थारा न देता, प्रत्येकाचे प्रश्‍न सोडवणार्‍या, मतदारसंघाचा विकास हाच आमचा ध्यास, हे ब्रिद सत्यात उतरवून एक आदर्श समाजकारणी कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण बनलेल्या, सर्वसामान्यांच्या या नेतृत्वाने राज्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमठवला आहे. केवळ नेता नव्हे तर, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अखंडपणे लढणारा झुंजार, अजिंक्य योद्धा अशी ओळख आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. आज या महान, तेजस्वी जनसेवकाचा वाढदिवस. त्यानिमित्त…
१९७८ मध्ये आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या रुपाने सातारा तालुक्याला प्रभावी नेतृत्व लाभले आणि वाई अथवा कराड मतदारसंघावर अवलंबून राहणार्‍या सातारा तालुक्याला विकासाची एक वेगळी आणि सकारात्मक दिशा मिळाली. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या परिसस्पर्शाने सातारा तालुक्याचे खर्‍या अर्थाने सोने झाले. आमदार ते सहकारमंत्री अशी अनेक पदे भूषविणार्‍या भाऊसाहेब महाराजांनी त्या- त्या पदांना साजेशे काम करुन सातारा तालुक्याचा चेहरामोहरा बदलून जिल्ह्याच्या राजकारणात सातारा तालुक्याला महत्वाचे स्थान निर्माण करुन दिले. भाऊसाहेब महाराजांच्या अकाली निधनानंतर तालुका आपल्या भाग्यविधात्या नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊसाहेब महाराजांनंतर सातारा तालुक्यात सुरु झालेली विकासाची गंगा अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आली. समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या बाबाराजेंनी लहान वयात ही जबाबदारी समर्थपणे पेलली आणि तालुक्याच्या राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अलौकिक कर्तुत्वाने एक आदर्श निर्माण केला. भाऊसाहेब महाराजांच्या काळातील जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नव्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांनी सातारा विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपले नाव कोरले. स्व. भाऊसाहेब महाराजांची उणीव आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरुन काढली आणि सातारा तालुक्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, रात्री, अपरात्री, कोत्याही प्रसंगी जनतेसाठी उपलब्ध असणारे, विनयशिल, संयमी, स्पष्टवक्ते, विकसनशील नेतृत्व. राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे कृतीशिल नेतृत्व  आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या रुपाने सातारा- जावली मतदारसंघाला लाभले आहे.
कृषी- औद्योगिक- शैक्षणिक क्रांती
स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासगंगेचा उगम करुन सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाला चालना दिली. अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यातील बेरोजगारीला लगाम घालण्याचे काम केले. त्यांच्या पश्‍चात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उंच शिखरावर नेवून ठेवले आहे. केवळ साखर निर्मीतीवरच अवलंबून न राहता साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प, सहवीज निर्मीती प्रकल्प असे मुल्यावर्धित प्रकल्प सुरु करुन साखर उद्योगाला खर्‍या अर्थाने उर्जीतावस्था प्राप्त करुन दिली. आज शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे वेळेत संपूर्ण बिल अदा करणारा राज्यातील एकमेव कारखानाअसा नावलौकिक अजिंक्यतारा कारखान्याचा आहे. अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत प्रत्यक्ष सूत उत्पादास प्रारंभ करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्व. भाऊसाहेब महाराज आणि सातारा तालुक्याचे स्वप्न पुर्णत्वास नेले. सूत गिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून प्रत्येक हाताला काम देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खर्‍या अर्थाने सत्यात उतरले आहे.
कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रीकी महाविद्यालयामुळे सातारा तालुक्यासह जिल्हाभरातील गोरगरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. मुलींना मोफत शिक्षण देणार्‍या या महाविद्यालयाने असंख्य गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि इंजिनियर्स घडवले आहेत. अजिंक्यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्थेच्या माध्यमातून सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मालाला दर्जा आणि रास्त भाव मिळवून दिला जातो. शेतकर्‍यांचा माल अधिक दर्जेदार असावा, त्याला चांगला भाव मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या कोल्ड स्टोरेज युनीटची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधूनिक शेतीची ओळख होण्यासाठी  फळे, फुले संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ख्यातीप्राप्त निसर्ग कृषी प्रदर्शनात दरवर्षी शेतकर्‍यांची जत्रा भरते आणि या आधुनिक कृषी प्रदर्शनात जिल्हाभरातील शेतकर्‍यांना आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी गहू- ज्वारी, तांदूळ महोत्सव आयोजित केले जात असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती घडली आहे.
जल, सिंचनक्रांती …
स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगून उरमोडी धरणाची पायाभरणी केली. आज धरण मोठ्या दिमाखाने उभे असून या धरणातील पाणी कालव्यांद्वारे तालुक्याच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन उरमोडी धरणाचे पाणी शेतकर्‍याच्या शेतात पोहचवून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार केले आहे. सातारा आणि जावली तालुक्यात असंख्य बंधारे बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात जल क्रांती घडवून आणली आहे. जावली सारख्या दुर्गम, डोंगराळ भागात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधार्‍यांमुळे परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर झाली आहे. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी बंधारे बांधले असून या बंधार्‍यांमुळे हजारो हेक्टर जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा शेतीसाठी नियोजनबध्द वापर होत असल्याने सातारा- जावली मतदारसंघ खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला आहे. जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून हे धरण लवकरच पुर्ण होणार आहे.
पाणीप्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य
सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपुर्ण व्हावे, हे ध्येय ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करुन सातारा शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली. कास धरणाच्या उंची वाढविण्याच्या प्रत्यक्ष सुरुवात झाली. निधी अभावी या प्रकल्पाचे काम रखडले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी  निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वास जात असून या महत्वकांक्षी योजनेमुळे सातारा शहरासह आजूबाजूच्या १५ ते २० गावांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. सातारा शहरालगत असलेल्या शाहुपूरी ग्रामपंचायतीला भेडसावणारा पाणीप्रश्‍नही नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोडवला आहे. शाहूपुरीसह दिव्यनगरी, कोंडवे, अंबेदरे, दरे बु. आदी गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. जावली तालुक्यातही याचपध्दतीने प्रत्येक गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून होत आहे.
पर्यटनाला चालना
सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मध्यवर्ती बस स्थानकाशेजारी उभी राहिली आहे. येत्या काही दिवसांतच या नवीन प्रशस्त वास्तूत शिवकालीन व ऐतिहासीक वस्तू स्थलांतरीत केल्या जाणार असून या प्रशस्त वास्तू संग्रहालयामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. याशिवाय ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याचा निश्‍चय आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला असून आगामी काळात हा संकल्पही पुर्णत्वास जाणार आहे. जागतीक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालेले कास पठार पाहण्यासाठी देश- परदेशातून पर्यटक हजेरी लावतात. कास पर्यटनवाढीच्या दृष्टीने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बोगदा ते अनावळे या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावले आहे तर कास, बामणोली भागातील १२ दुर्गम गावातील पोच रस्त्यांच्या कामासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या जावली तालुक्यातही पर्यटनवाढीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रस्ताव तयार करुन त्यांच्या मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. कुसुंबी पर्यटनस्थळाला जोडणारे रस्ते, संपुर्ण मेढा भाग कास बामणोलीला जोडणारा रस्ता, कास बामणोली ते महाबळेश्‍वर रस्ता असे महत्वपुर्ण रस्ते तयार करुन दळणवळणाची उत्तम सोय करुन पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी महत्वपुर्ण पावले त्यांनी उचलली आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर जाण्यासाठी परळी येथून रोप वे करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. गोडोली येथील नैसर्गिक तळ्याच्या सुशोभोकरणासाठीही त्यांनी पाठपुरावा सुरु केला असून लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
साहित्य, कला, क्रीडा व संस्कृतीचे जतन
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक चळवळीलाही उभारी देण्याचे महान कार्य सातत्याने केले आहे. विविध क्रीडा प्रकारात सातारा शहरासह जिल्हाभरातून खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शरिरसौष्ठव, भारोत्तोलन, कबड्डी, क्रिकेट, बॉक्सिंग, बास्केट बॉल, फुटबॉल, हॉकी, ऍथलेटीक्स आदी क्रीडा प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली असून अशा क्रीडा स्पर्धांना सातत्याने मदतीचा हात दिला आहे. स्वत: एक उत्तम धावपटू असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई, गोवा, सातारा आदीठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले असून मॅरेथॉन मध्ये धावणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार अशी वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे. मतिमंद खेळाडूंना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र राज्य डेफ क्रिकेट फेडरेशन विरुध्द मराठी सिने कलावंतांच्या प्रदर्शनीय क्रिकेट  सामान्याचे तसेच मेढा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे नेटके आयोजन केले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज जिल्हा क्रीडा संकुलात बास्केट बॉल, बॅडमिंटन, स्विमिंग आदी खेळामध्ये खेळाडूंची संख्या वाढत आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने होत असलेल्या सातारा फेस्टीवलमुळे सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे कार्य आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हातून घडत आहे. साहित्यसंस्कृती वाढीसाठी सातार्‍यात होणारी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने आदींसाठीही ते नेहमीच सहकार्याची भावना ठेवून साहित्य चळवळ वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करत असतात.
गरजूंना मदतीचा हात
मतदारसंघात चौफेर विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी समाजकार्याचा अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जावली तालुक्यातील महु- हातगेघर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. उरमोडी, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे आणि त्यांचे प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जनतेला न्याय देण्याची भुमिका घेतली आहे. पवनचक्क्या, टोलनाके व औद्योगिक कंपन्या यामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य दिले जावे, यासाठी प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसून भुमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त, जळीतग्रस्त, उघड्यावर पडलेल्या कुटूंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्नही त्यांनी अनेकदा केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांतून हजारो रुग्णांना जगण्याची नवी दिशा दिली गेली. जयपूर फूट शिबीराच्या माध्यमातून दिव्यांगांना मोफत कृत्रीत हाप, पाय बसवले, हजारो दिव्यांगांना कुबड्या, तीनचाकी सायकल, व्हील चेअर देवून या बांधवांचे जगणे सुसह्य करुन एक आदर्श समाजसेवक कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यारुपाने जिल्ह्याने पाहिले आहे.
सातारा शहराचा कायापालट
ऐतिहासिक सातारा शहराला आधुनिकतेकडे नेताना शहरातील सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण आणि दर्जेदार डांबरीकरण करण्याचा सपाटा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने लावला आहे. राज्य शासन, केंद्र शासनासह नगरोत्थान, जिल्हा नियोजन समिती, अशा मिळेल त्या योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील रस्ते चकचकीत केले आहेत. पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला असून त्यामुळे वाहतूक कोंडी आहे.  आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेवरुन सर्वच रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पोवई नाका ते विसावा नाका (कोरेगाव रोड) या रस्त्याचे चौपदरीकरण, विसावा नाका ते कृष्णानगर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. मोळाचा ओढा- मध्यवर्ती बस स्थानक ते गोडोली नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १९ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पोवई नाका, जिल्हा रुग्णालय ते जरंडेश्‍वर नाका या रस्त्याच्या रूंदीकरणाचेही काम युध्दपातळीवर सुरु आहे. सुसज्ज फीश मार्केट उभारणीसाठी दोन कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. भाजी मंडईचे विस्तारीकरण, हॉकर्स झोन, पार्किंग झोन आदी अद्ययावत सोयी, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे.
सातारा- जावलीत विकासाचा झंजावात
सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे पुर्ण करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संपुर्ण मतदारसंघात विकासाचा झंजावात अखंड चालू ठेवला आहे. राजकीय गट- तट न पाहता विकासकामे केल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे हे एक लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दुर्गम आणि डोंगराळ जावलीच्या खोर्‍यातील खेड्यापाड्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. कोट्यवधीची विकासकामे खेचून आणत आमदारांनी आपल्या कतृत्वाचा नारा जावलीच्या दर्‍याखोर्‍यात घुमवला आहे. मेढा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, न्यायालयाची सुसज्ज इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रशस्त इमारत व कर्मचारी निवासस्थान आदीसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवून देऊन ही सर्व कामे मार्गी लावली. मेढा ग्रामिण पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी १ कोटी ६९ लाखाचा निधी मिळवला. गेली ३० वर्ष रखडलेल्या कुसुंबी- कोळघर रस्त्यासाठी ९० लाखाचा निधी उपलब्ध करुन या रस्त्याचा प्रश्‍न महतप्रयासाने मार्गी लावला. वेण्णा नदीवरील भामघर पुलासाठी ६० लाख, खर्शी बारामुरे रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी ४० लाख, पावगणी कुडाळ रस्ता व महू गावाजवळच्या पुलासाठी दोन कोटी ६० लाखण एकीव ते दुंद रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख निधी मिळवून दिला तर याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. बोंडारवाडी धरण, महू- हातगेघर रिंगरोडचे काम आणि या धरणाच्या प्रलंबीत कामांना चालना दिली. कोयना पुर्नवसीत गावांना नागरी सोयी- सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मेढा ते सातारा रस्त्यासाठी २५ लाख, आलेवाडी खिंड पदमलेमुरा, रेंगडीमुरा धनगर पेढा रस्त्याच्या कामासाठी ८२ लाख, रेंगडीमुरा- मेढा रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या पाच वर्षात सातारा आणि जावली मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करुन दिला. बहुसं‘य कामे मार्गी लागली असून उर्वरीत सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्गम अशा जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगराळ भागातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून प्रत्येक गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या इमारती बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भागातील जनतेला खर्‍या अर्थाने ज्ञानाची कवाडे खुली करुन दिली आहेत. केवळ विकासकामे करण्याकडेच कल न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात असाच सुरु राहणार असून येत्या काही दिवसांत सातारा- जावली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेला पहावयास मिळेल हे निश्‍चित !
जनतेसाठी वाट्टेल ते करणारा समाजसेवक
संपूर्ण जगभरात कोरोना या महाभयंकर साथ रोगाने थैमान घातले. आपल्या सातारा जिल्ह्यातही कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःला समाजासाठी झोकून दिले. लॉकडाऊनमध्ये हजारो गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. सातारा, जावळी तालुक्यातील असंख्य गावात सॅनिटायझर फवारणी केली. कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला.  सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ होत होती.. सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत होते अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना हि परिस्थिती आटोक्यात यावी, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८० बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले. सेंटरमध्ये ४० बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज तर उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त होते. हे सेंटर भोसले कुटुंबीयांनी विना मोबदला कोरोना बाधितांच्या उपचारासाठी प्रशासनाकडे सुपूर्त केले.  मेढा रुग्णालयात येथेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून ३० बेडचे सेंटर सुरु झाले. त्यासाठी एक्स रे मशीन उपलब्ध होत नव्हती किंवा त्यासाठी निधीही मिळत नव्हता. या सेंटरची गरज ओळखून रुग्णसेवेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  त्यांच्या कुटूंबाच्यावतीने एक्स रे मशीन भेट दिली. कोरोना महामारीच्या काळात जनतेसाठी वाट्टेल ते करणारा समाजसेवक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या रूपाने संपूर्ण जिल्ह्याने पहिला.
सातारा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवला
कास धरण म्हणजेच सातारकारांसाठी जीवनदाता होय. कास धरणाची उंची वाढवली तर सातारा शहराचा आणि सातारा ते कास या मार्गावरील १५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल असा दूरदृष्टीने विचार करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते.ना. पवार यांनी त्यावेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून या प्रकल्पाला ४० कोटी निधी दिला. पुढे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अभ्यासपूर्ण आणि अथक पाठपुरावा करून वन विभाग, हरित लवाद, युनेस्को आदी अनेक विभागाच्या परवानग्या मिळवल्या आणि मग प्रत्यक्ष कास धरण उंची वाढवण्याच्या कामाला प्रारंभ झाला. पुढे निधी अभावी या प्रकल्पाचे रखडले. पालिकेत सत्ता नसतानाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी पुन्हा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ज्या ना. अजित पवारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांच्या सहकार्याने  वाढीव ५७.९१ कोटी मंजूर करून घेतला.

सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी रुपये निधीला मान्यता मिळाली आणि हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. वाढीव निधी मिळाल्याने या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून १५ मे पर्यंत काम पूर्णत्वास जाणार आहे. सातारकरांच्या खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे.  दरम्यान,कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधीत होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठीही निधी मंजूर करावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली होती. या पुलाच्या निधीलाही ना. पवार यांनी मंजूरी दिली असून सातारा, कास- बामणोली या रस्त्यावरील नवीन पूलासाठी ३.५ कोटी रुपये निधीची तरतूद ना. पवार यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामालाही आता गती मिळणार असून लवकरच भव्य आणि दर्जेदार रस्ता दळणवळणासाठी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची कवाडे झाली खुली, सातारच्या मेडीकल कॉलेजसाठी ४९५ कोटी रुपये मंजूर
सातारा जिल्ह्यातील इच्छुक विध्यार्थ्यांना साताऱ्यातच वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे, हा उदात्त हेतू ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर जागेचा प्रश्न  निर्माण झाला. मुंबई येथे  अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांची भेट घेवून सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली होती.  आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला.  त्यासाठी ६१ कोटी रुपये निधीची तरतूदही  करण्यात आली होती. यांनतर जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला ना. पवार यांनी प्राधान्य देत सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढला. ना. अजित पवार आणि ना. अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी व  अनुषांगिकबांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने  मान्यता दिली असून त्यासाठी  एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्हावासियांच्या मेडिकल कॉलेजचे स्वप्न सत्यात उतारण्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज उभारणीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून  सातारा जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे  यांनी मार्गी लावला. तसेच मेडिकल कॉलेजसाठीची पदनिश्चिती आणि पदनिर्मिती तात्काळ होण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयतानं मोठे यश मिळाले. याबाबतही राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आणि सातारा मेडिकल कॉलेज साठीची पदे निश्चित करून ती भरण्याचा निर्णयही झाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार झाले आहे आणि सातारकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे.
हद्दवाढ करून शहरासह उपनगरांना दिला न्याय 
राजकारणापेक्षा सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासाला कायम प्राधान्य देणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर लगेचच विकासकामे मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला होता.  राज्याच्या रखडलेल्या आणि चर्चेच्या ठरलेल्या खातेवाटपानंतर बुधवारी झालेल्या एकदिवसाच्या विशेष अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, जावली तालुक्यातील महत्वकांक्षी बोंडारवाडी धरण आणि सातारा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले मेडीकल कॉलेज ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास
मंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. हे तीनही प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी आग्रही मागणी केली.
एकदिवसाच्या अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.
सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. शहराची हद्दवाढ झाल्यास हरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे अत्यावश्यक असल्याने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय असून सातारा पालिकेने वारंवार सदरचा प्रस्ताव नरविकास विभागाकडे पाठवला. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून विधिमंडळात दि. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी तारांकित प्रश्नही केला होता. नगरविकास विभागाने सुचविलेल्या सर्व त्रुटींची पुर्तता सातारा नगर पालिकेने केली. त्यामुळे या प्रस्तावाला तातडीने मंजूर द्यावी आणि सातारा शहर व उपनगरांच्या सर्वागिण विकासाचा अडसर दूर करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लेखी निवेदनाद्वारे ना. ठाकरे यांच्याकडे केली होती. हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन ना. ठाकरे यांनी त्यावेळी दिले होते. दरम्यान, हद्दवाढ प्रस्ताव मंजुरीबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास मंत्री ना. शिंदे यांनाही लेखी निवेदन दिले आणि त्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे आश्वासन दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर हद्दवाढ मंजूर करून घेतली. मंजुरीचे पात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हाती दिले. हद्दवाढ मंजूर करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराच्या विकासाला गती मिळवून दिली आहे आणि त्रिशंकू भागालाही विकासाच्या प्रवाहात आणले आहे.
जनहिताचे निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी ख्याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामाच्या रुपाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विचार पोहचले असून आ. शिवेंद्रसिंहराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनतेतील प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर सामान्य माणूसही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी थेट संपर्क साधू लागला. मागेल ते काम पुर्ण करण्याची धमक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये असल्याने सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात डांबरी रस्ता, वीज, समाजमंदीर, अंगणवाडी, शाळा इमारत, पाणीपुरवठा योजना असा चौफेर विकास झाला आहे. जनसामान्य थेट आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे येवू लागल्याने आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये वाढीस लागली. कोणताही भेदभाव न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे मतदारसंघातील जनतेच्या सुख- दुख:त नेहमीच सहभागी होत असतात. त्यामुळे  आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनता यांचे घनिष्ठ नाते निर्माण झाले आहे. जनतेने वेळोवेळी टाकलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भूरळ घातली. यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहायला मिळते. नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांलाही संधी दिली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निस्वार्थी स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी मनाने जोडले गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची फौज सोबत मिरवणार्‍या नेत्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ फिरवण्यापेक्षा त्यांच्या हातला काम मिळाले पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते. आ. शिवेंद्रसिंहराजे कोणत्या राजकीय पक्षात आहेत, याहीपेक्षा ते जनतेच्या ह्रदयात कायस्वरुपी आहेत, हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सातार्‍यासह जावलीतील प्रत्येक गावात मुलभूत सोयी- सुविधा पुरवून, विकासापासून वंचीत राहिलेल्या जनतेला त्यांनी प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. सत्ता कोणाचीही असो मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी खेचून आणणारे एकमेव लोकप्रतिनिधी अशी ख्याती असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांना भरिव निधी मिळवून ही कामे मार्गी लावली आहेत. सातारा- जावलीचा विकास हाच आपला ध्यास हे ब्रीद घेतलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कतृत्वाने हे ब्रीद सार्थ ठरवले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता आपले कर्तृत्व, जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट केला आहे. हा मतदासंघ विकासाचा रोल मॉडेल ठरावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न असून आगामी काळात त्याचा प्रत्यय येईल, हे निश्‍चित! मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच जनतेच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या महान जनसेवकाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
– अमर मोकाशी         (जनसंपर्क अधिकारी, सातारा)
७३५००१०३०३

Back to top button
Don`t copy text!