
दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । सातारा । जिल्हा उद्योग केंद्र, सातारा पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्हा कारागृह येथील बंदीवानांसाठी मोफत “दोन महिने कालावधीचा कॉम्प्युटर अकाउंटिंग विथ ऑफिस असिस्टंट प्रशिक्षण कार्यक्रम व एक महिना कालावधीसाठी मोफत मोटर रिवाइंडिंग प्रशिक्षण” कार्यक्रम दिनांक 28डिसेंबर रोजी सुरू करण्यात आला.
कारागृहातील तरुण बंदी प्रशिक्षित होवून कारागृहातून सुटल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहावेत व स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाने तसेच सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण कारागृहातील बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, जिल्हा उद्योग केंद्र साताराचे उमेशचंद्र दंडगव्हाळ, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, तुरुंग अधिकारी राजेंद्र भापकर, , सुप्रिया कुंटे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, MCED शितल पाटील, प्रगती महिला कल्याणकारी शैक्षणिक संस्थेच्या अलका पाटील, संगणक प्रशिक्षक नितीन गायकवाड, सुभाष सोनवणे, किशोर बांडे आदी उपस्थित होते.