स्थैर्य, मुंबई, दि.२२: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ याच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. बहीण रियाप्रमाणेच शोविकला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकिल सतीश मानशिंदे यांनी कोर्टाकडे विनंती अर्ज केला होता. परंतु ही विनंती कोर्टाने फेटाळली असून त्याच्या कोठडीत आणखी 15 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे येत्या 3 नोव्हेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीच राहावे लागणार आहे. एक महिना तुरुंगात काढल्यानंतर एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर रिया चक्रवर्तीची 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली होती.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 8 सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल बासित यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे.
खरं तर एनसीबीने शोविकसह रियाच्या जामीनाला विरोध दर्शवला होता. रिया आणि शोविक ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि तिने सुशांतला ड्रग्जचे सेवन करण्यास उद्युक्त केले. तसंच त्याला ते उपलब्ध करून दिले, त्यासाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोप एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.
रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले होते. सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन होते. रियासह आणखी दोन अभिनेत्रींनीदेखील याची कबुली दिल्याचे त्यांनी म्हटले. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले आहे.