स्थैर्य, सातारा, दि.०५: पुणे- बंगळूर महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावानजीक आज दुपारी वडाचे जुने झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली एक दुचाकी व बोलेरो जीप सापडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली.
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारासही घटना घडली. त्यात कर्हाड बाजूकडून सातारा बाजूकडे जाणार्या मार्गिकेवर वडाचे झाड कोसळले. वळसे गावानजिक असलेल्या इंद्रप्रस्थ हॉटेलसमोर हा प्रकार घडला. या झाडाखाली एक दुचाकी व बोलेरो जीप सापडली. त्यात दुचाकीवरुन प्रवास करणारे शैलेश भोसले (वय 35) व महेश भास्कर (वय 32) हे कोल्हापूरचे प्रवासी किरकोळ जखमी झाले. या झाडामुळे वीजवाहक तार तुटल्यामुळे घटनेचे गांभीर्य आणखीच वाढले.
याबाबतची माहिती मिळताच ‘हायवे हेल्पलाईन’ विभागाचे दस्तगीर आगा तसेच त्यांची टीम, कर्हाडच्या महामार्ग वाहतूक केंद्राच्या सहायक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील, सहायक फौजदार राजू बागवान, पोलिस नाईक वैभव पुजारी, रुपेश कारंडे, रायसिंग घोरपडे, देवदत्त शेडगे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हायवे मृत्यूंजय दूत पिंटूशेठ सुतार, सोहेल सुतार तसेच बोरगाव पोलिसांनी जखमींना बाहेर काढले. क्रेन तसेच दोन कटरच्या साह्याने झाडाच्या फांद्या कापून महामार्ग मोकळा करण्यात आला.