वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन करून संपवले जीवन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । पाचोरा (जि.जळगाव) । जीवनाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरी विषारी द्रव घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोहटार ता.पाचोरा येथे घडली. विष घेतल्यानंतर यातील आजोबांनी पोलिसांना फोन करून आम्ही दोघे आत्महत्या करीत असल्याचे कळविले होते. सेवानिवृत्त एसटी कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (७८) आणि प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) अशी या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. शनिवार, दि. ८ रोजी भल्या पहाटे या वृद्ध दाम्पत्याने विषारी द्रव घेतले. यानंतर, काही वेळातच ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलिसांना आम्ही जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, असा फोन केला.

पाचोरा पोलिसांचे पथक लगेच लोहटार येथे पोहोचले आणि या वृद्ध दाम्पत्यास ताब्यात घेत, खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचारास त्यांनी दोन दिवस प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी भल्या पहाटे प्रमिलाबाई यांचा, तर सकाळी ८च्या सुमारास ईश्वर पाटील यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नीचा एकाच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आम्ही जीवनास कंटाळून आत्महत्या करीत आहोत, यास कोणालाही दोषी धरू नये, अशी ईश्वर पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.प्रकाश पाटील हे करीत आहेत. या दाम्पत्यास दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे आहेत.


Back to top button
Don`t copy text!