दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । वाई । मांढरदेव येथील काळुबाई मंदिरातील तीन लहान मोठ्या दानपेट्या अज्ञात व्यक्तीकडून शुक्रवारी मध्यरात्री (दि ५) फोडण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे .मांढरदेव देवस्थानचे सचिव रामदास खामकर यांनी याबाबत वाई पोलिसात तक्रार दिली आहे. मांढरदेवी येथील मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच परिसरात व वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली.
मांढरदेव येथील काळूबाई मंदिरात शुक्रवारी (दि ५) मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान मंदिरातील मुखदर्शनाच्या ठिकाणी ठेवलेली मोठी दानपेटी तसेच नारळ फोडण्याच्या ठिकाणी ठेवलेली आणि कासवाच्या जवळ ठेवलेली लहान दानपेटी,अशा तीन दानपेट्या तोंडावर काळे कपडे घातलेल्या अज्ञात इसमाने मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान फोडण्याचा प्रयत्न केला आहे. असे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे .याबाबत सकाळी देवस्थानचे कर्मचारी रामदास मांढरे यांनी फोन करून मला कळवले. मी स्वतः पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने तीन लहान मोठ्या दानपेठ्या फोडण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आले आहे. मांढरदेवी येथे दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समजतात मांढरदेव व वाई तालुका परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.काळुवाई मंदिर परिसरात दिवस रात्र सुरक्षा रक्षक असताना ,मंदिर बंद असताना मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत अज्ञात व्यक्ती दानपेटी फोडण्या पर्यंत कसा पोहोचला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.