स्थैर्य, सातारा, दि.१५: ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आज सायंकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडून शहरात पायी फेरफटका मारत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. अंगरक्षकांनी हटकल्यानंतर त्यांनी पळ काढला. थोड्यावेळाने पुन्हा तेच युवक त्याठिकाणी आले आणि पुन्हा दुचाकीवरुन वेगात निघून गेले. यानंतर देसाई यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्या युवकांचा शोध सुरू केला. रात्री उशिरा पोलीस दलाने देसाई त्यांच्या घरी सुरक्षित असून, काळजीचे कारण नसल्याचे पत्रक प्रसिद्ध करत पुढील तपास सुरू असल्याचे जाहीर केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणप्रश्नी काही युवकांनी देसाई यांच्या घराबाहेर शेणाच्या गोवर्या जाळत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. याघटनेचा संबंध मराठा आरक्षण आंदोलनाशी आहे का, याचा देखील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, शंभूराज देसाई सुरक्षित गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आपल्या निवासस्थानी आहेत. ते सुरक्षित आहेत आणि त्यांच्याविषयी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती सातार्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.