स्थैर्य, पाटण, दि. 1 : मोरणा विभागाच्या पूर्वेला असणार्या कुसरुंड गावामधील पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेला 40 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळल्याने मोरणा विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाला.
कोरोना व्हायरसने सगळे जग व्यापले आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज तीन हजारावर कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये गेले आठ- दहा दिवस वीस ते पंचवीस कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये पाटण तालुक्यातील विविध गावांमध्येही कोरोना बाधित सापडत असल्याने तालुक्यातील संबंधित विभाग नेहमीच अलर्ट राहिला आहे. कुसरुंड येथील दोघे जण पुण्याहून गावाकडे यायला निघाले होते. मात्र त्यातील एकाला जादा प्रमाणात ताप जाणवू लागल्याने तो घरी न येता तसाच कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचारासाठी स्वत:हून दाखल झाला व एकजण तसाच आपल्या कुसरुंड येथील राहत्या घरी आला. मात्र आज सातारा जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी जिल्ह्यातील एकूण चौदा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट केले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील सहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये मोरणा विभागातील कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट होताच तालुका प्रशासन तत्काळ त्या गावामध्ये हजर होवून पुढील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून कुसरुंड येथे आहे.