
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : फलटण तालुक्याच्या पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत, तर माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वागताध्यक्ष आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंत भोसले आणि ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते मेहता दांपत्याचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी आमदार श्री. सचिन पाटील, माजी आमदार श्री. दिपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते श्री. प्रल्हादराव साळुंखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय आणि सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत.
तसेच, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख, ‘दैनिक ऐक्य’चे संपादक श्री. शैलेंद्र पळणीटकर, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. हरिष पाटणे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. विश्वासराव निंबाळकर, माजी नगराध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले, श्री शांतिनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दिपक मेहता, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. पिंटू इवरे, आर.पी.आय. जिल्हा सचिव श्री. विजय येवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. काशिनाथ शेवते आणि मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या समारंभात सातारा जिल्ह्यातील अन्य ज्येष्ठ पत्रकारांचाही विशेष सन्मान केला जाणार असून, एका स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. कोणत्याही प्रकारची भेटवस्तू न आणता, आपली उपस्थिती हाच मेहता दांपत्याचा सन्मान असेल, असे आवाहन सत्कार समितीने केले आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.