दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । देशाच्या अमृतकाळात भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अमृता फडणवीस यांनी आता राज्यातील मातृशक्तीचे नेतृत्व करण्यासाठी सक्रिय राजकारणात यावे,असे आवाहन भाजप नेते आनंद रेखी यांनी शनिवारी केले.नुकतीच त्यांनी अमृता फडणवीस यांची भेट घेत यासंबंधीची मागणी केल्याचे रेखी म्हणाले.
कुटुंबाचा भक्कम असा राजकीय वारसा असताना ही राजकारणापासुन अलिप्त राहून देखील तळागाळापर्यंत पोहोचून उत्कृष्ट समाजसेवा करता येते, हे अमृताजींनी दाखवून दिले आहे.पंरतु, अनेकदा राजकीय द्वेषातून त्यांच्यावर आरोप केले जातात.असे असतांनाही अत्यंत संयमी वृत्तीने प्रत्येक टिकेला समर्पक प्रत्युत्तर देण्याचे वकुब अमृता फडणवीस यांच्याकडे आहे.राज्यात सध्या संयमी, मितभाषी, समजूतदार, संवेदनशील महिला नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे.अशात अमृताजींनी पुढाकार घेत ‘समाजासाठी राजकारण’चा वसा घेत महिलाशक्तीचा आवाजाला बळ द्यावे, असे भावनिक आवाहन आनंद रेखी यांनी केले.
‘दिव्या फाउंडेशन’च्या वतीने अमृताजी विविध सामाजिक कार्यक्रम राबवून समाजपयोगी कार्य करीत आहेत.जलसिंचन, स्वच्छ भारत, महिला शक्ती अथवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले आहेत.आता त्यांनी हेच व्हिजन घेवून भविष्याचा वेध घ्यावा,अशी मागणी रेखी यांच्यावतीने करण्यात आली. अमृता जी या त्यांच्या शब्द कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण तसेच सदैव सकारात्मक दृष्टिकोणामुळे ओळखल्या जातात. बॅंकिंग क्षेत्रातील त्यांचा अभ्यास विशेष महत्वाचा आहे. पंरतु, एक गृहिणी असून देखील समाजकारणासाठी त्या सदैव प्रेरित करीत असतात.राज्याच्या राजकारणात अशा वंदनीय मातृशक्तीची नितांत आवश्यकता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धागिणी म्हणून अमृताजींची ओळख आहेच, मात्र सामाजिक गुणवत्तेच्या आधारे अमृता जींनी त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांनी आता राजकारणात यावे, असे रेखी म्हणाले. विरोधकांच्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचे शाब्दिक कौशल्य अमृताजींकडे आहे.अत्यंत सुचक शब्दांमध्ये त्या विरोधकांच्या टिकेची धार बोथट करतात.अशात केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांप्रमाणे आरोपांची चिखलफेक करणाऱ्यांना राजकारणातून हद्दपार करण्याची गरज आहे.अशात विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी अमृता फडणवीस यांच्यासारख्या रणरागिणीची राजकारणात नितांत आवश्यकता असल्याचे रेखी म्हणाले.