शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे अमोल साईनवार यांना २०२० चा अंत्योदय पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०५: सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजासाठी विधायक कामे करणाऱ्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल साईनवार हे त्यापैकीच एक नाव. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ग्रामविकासासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत सुमारे ७०० हून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १० शाळांना डिजीटल करणे, शौचालय बांधणे, वैद्यकीय सेवा पुरविणे अशा विविध कार्यातून अमोल साईनवार सक्रिय आहेत. त्याच बरोबर शिवप्रभा शेतकरी क्लबच्या माध्यमातून शेतकऱ्यांनो शेतकरी जगावा, शिवप्रभा कल्याण योजना, प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आजमितीस ८ राज्यातील ३२ जिल्ह्यात त्यांचे कार्य सुरु आहे.

शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते अमोल साईनवार हे मुंबईतील डी.एच.गोखले न्यासाच्या निधीतून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिल्या जाणाऱ्या “अंत्योदय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार प्रदान केला नसल्यामुळे यंदा हा पुरस्कार छोटेखानी कार्यक्रमाच्या स्वरुपात, सोमवार, दि. ५ एप्रिल २०२१ रोजी साईनवार यांच्या ठाणे येथील निवास स्थानी पार पडला. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून डी.एच.गोखले न्यासाच्या चंदा गोखले (आगाशे), एन. वेणुगोपाल आणि प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पोखरणा आणि मुख्य देखभाल व संकुल सेवा अधिकारी उमेश मोरे यांच्या उपस्थितीत अंत्योदय पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.

अमोल साईनवार यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना “शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या कामाची दखल घेत कौटुंबिकरित्या अंत्योदय पुरस्कार देऊन सत्कार केल्याबद्दल डी.एच.गोखले न्यास आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या दोन्ही संस्थाना व पदाधिकाऱ्यांना खूप – खूप  धन्यवाद देत आभार मानले.” अंत्योदय पुरस्काराची संपूर्ण रक्कम राम मंदिराच्या निर्माणासाठी देण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

सन २००० पासून दिला जाणारा हा पुरस्कार आतापर्यंत श्री. गिरीश प्रभुणे, डॉ. श.शं.कुलकर्णी, डॉ. अविनाश आचार्य, श्रीमती सुनंदा पटवर्धन, डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ.बाबा नंदनपवार, मेळघाटात कार्य करणारे सुनिल व निरुपमा देशपांडे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, रामोशी – बेरड समाजाच्या विकासासाठी कार्य करणारे डॉ. भीमराव गस्ती. श्री. भिवा (दादा) गावकर, नारायणराव देशपांडे, प्रदीप वडनेरकर, सेरेबल पाल्सीग्रस्त मुलांसाठी कार्य करणारे सुरेश पाटील, वर्षा परचुरे यांना देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!