स्थैर्य, मुंबई, दि.०३: मुंबईतील डी.एच.गोखले न्यासाच्या निधीतून आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा “अंत्योदय पुरस्कार” यंदा शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते अमोल साईनवार यांना सोमवार, दि. ५ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या ठाणे येथील निवास स्थानी प्रदान करण्यात येणार आहे.
२०२० सालचा हा पुरस्कार मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराची पूर्तता केली गेली नसल्यामुळे यंदा हा पुरस्कार छोटेखानी कार्यक्रमाच्या स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.
एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरूप असून कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे डी.एच.गोखले न्यासाच्या चंदा गोखले (आगाशे), राहुल गोखले आणि प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पोखरणा आणि मुख्य देखभाल व संकुल सेवा अधिकारी उमेश मोरे यांच्या उपस्थितीत अमोल साईनवार यांना हा पुरस्कार त्यांच्या ठाणे येथील निवास स्थानी समारंभपूर्वक देण्यात येणार आहे.
जुन्या पिढीतील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक कै. डी.एच.तथा बाळासाहेब गोखले यांच्या इच्छेनुसार डी.एच.आणि शामला गोखले न्यासाची स्थापना झाली, २००० पासून या पुरस्कार योजनेचा प्रारंभ झाला. तळागाळातील समाजघटक व वंचित लोकांच्या विकासासाठी निरलसपणे काम करणाऱ्या व्यक्तीस सन्मानचिन्ह तर संस्थेसाठी रु. १ लाख रोख असे अंत्योदय पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी निवड झालेले अमोल साईनवार शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ग्रामविकासासाठी कार्यरत आहेत. सुमारे ७०० हून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १० शाळांना डिजीटल करणे, शौचालय बांधणे, वैद्यकीय सेवा पुरविणे अशा विविध कार्यातून अमोल साईनवार सक्रिय आहेत. त्याच बरोबर शिवप्रभा शेतकरी क्लबच्या माध्यमातून शेतकऱ्यांनो शेतकरी जगावा, शिवप्रभा कल्याण योजना, प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आजमितीस ७ राज्यातील ३२ जिल्ह्यात त्यांचे कार्य सुरु आहे.
सन २००० पासून दिला जाणारा हा पुरस्कार आतापर्यंत श्री. गिरीश प्रभुणे, डॉ. श.शं.कुलकर्णी, डॉ. अविनाश आचार्य, श्रीमती सुनंदा पटवर्धन, डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ.बाबा नंदनपवार, मेळघाटात कार्य करणारे सुनिल व निरुपमा देशपांडे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, रामोशी – बेरड समाजाच्या विकासासाठी कार्य करणारे डॉ. भीमराव गस्ती. श्री. भिवा (दादा) गावकर, नारायणराव देशपांडे, प्रदीप वडनेरकर, सेरेबल पाल्सीग्रस्त मुलांसाठी कार्य करणारे सुरेश पाटील, वर्षा परचुरे यांना देण्यात आला आहे.