
दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी गेले अनेक वर्षांची होती. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३१ रुग्णवाहिका ह्या चौदाव्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या आहेत. त्या पैकी सहा रुग्णवाहिका ह्या फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदरील रुग्णवाहिकांच्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार असून या रुग्णवाहिकांमुळे निश्चित ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणार आहेत, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदेने चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या ३१ रुग्णवाहिकांपैकी सहा रुग्णवाहिका ह्या फलटण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदरील रुग्णवाहिकांचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते फलटण पंचायत समितीच्या आवारामध्ये करण्यात आले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, उपसभापती सौ. रेखा खरात, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सौ. रेश्मा भोसले, सौ. विमल गायकवाड, संजय कापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.