
स्थैर्य, कराड, दि. 20 : लोकाभिमुख,पारदर्शक कारभारामुळे आदर्श राजकीय नेते म्हणून ज्यांना संपूर्ण देश ओळखतो ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आम. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील आरोग्य विभागासाठी घेतलेल्या अनेक धाडशी व नाविन्यपूर्ण निर्णयांमुळे आज कोरोना संसर्गाला महाराष्ट्र यशस्वीपणे तोंड देत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि शहरांतील मोठी शासकीय रुग्णालये यांना सक्षम बनविण्यासाठी आम. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना आर्थिक तरतूद वाढवली. इमारतींच्या दुरुस्ती, रोगनिदान करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे (मशीन), सर्व आजारांवर उपचार होण्यासाठी औषधांचा पुरवठा या महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला.
विशेषतः प्रत्येक प्राथमिक केंद्रासाठी किमान एक अॅम्बुलन्स असावी यासाठी मा.पृथ्वीराज चव्हाण यांनी आग्रह धरला होता. कोणत्याही व्यक्तीला गरजेनुसार तातडीने मदत मिळाली पाहिजे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकच हेल्पलाईन नंबर असावा असेही त्यांचे म्हणणे होते. त्यातूनच 108 या नंबरची कल्पना पुढे आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात 108 हा सिम्बाॅल असलेल्या हजारो अॅम्बुलन्स धाऊ लागल्या. कोणीही 108 नंबरला फोन केला की, तातडीने अॅम्बुलन्स हजर होऊ लागली. दुर्गम, डोंगरी भागातील लोकांसाठी तर ही योजना वरदान ठरली.
सध्या कोरोनाग्रस्तांच्या सेवेत हीच 108 रांत्रदिवस रस्त्यावर धावत आहे. कोरोना वायरसची लागण होईल या भितीने मोठे हाॅस्पिटल, स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, खाजगी व कार्पोरेट संस्थांच्या अॅम्बुलन्स बंद होऊन जाग्यावरच उभ्या राहिल्या. मात्र 108 च्या चालकांनी जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांची अखंड सेवा केल्याने महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. अॅम्बुलन्स 108 कोरोनाग्रस्तांसाठी वरदान ठरल्या आहेत.
अँब्युलन्स 108 चा ऐतिहासिक निर्णय म्हणजे मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दूरदृष्टी निर्णयांची एक मिसाल आहे.
कोणाच्यातरी वैयक्तिक लाभापेक्षा आम जनतेच्या भल्यासाठी प्रसंगी कसल्याही परिणामांची पर्वा न करता अत्यंत पारदर्शकपणे कठोर निर्णय घेणारे नेते म्हणून जनता मा. पृथ्वीराज चव्हाण यांना ओळखते. जनतेच्या आणि देशाच्या व्यापक हितासाठी मुलभूत काम उभे राहिले पाहिजे, पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, सर्वांना लाभ मिळेल अशाच योजना राबविल्या पाहिजेत यासाठी मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना मिळालेल्या राजकीय सत्तेचा उपयोग केला. म्हणूनच आज ते निर्भीडपणे राजकारणात वावरत आहेत.
दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेते मा. पृथ्वीराज चव्हाण यांचा आम्हाला अभिमान वाटतो. सत्तेच्या सारीपटावर आपल्याला हवे तसे मोहरे फिरवून राजकीय डावपेच यशस्वी करण्यात सगळेच राजकारणी गुंतलेले असताना मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र स्वतःला यापासून नेहमीच अलिप्त ठेवले. किंबहुना तो त्यांचा पिंडच नाही. अभ्यासपूर्ण, समाजाभिमुख राजकारण ही त्यांची विचारसरणी आहे. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांची हीच प्रतीमा भावते आणि प्रेरणाही देते.
राजेंद्र आनंदराव शेलार, माजी सरचिटणीस, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी