दैनिक स्थैर्य । दि. २१ जानेवारी २०२३ । मुंबई । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आपल्या कलेच्या माध्यमातून पोहोचवण्याचे उदात्त कार्य करणारे आंबेडकरी चळवळीतील महान कवी, विनोदी बादशाह कोकणरत्न गोविंद दादा म्हशीलकर यांचा ३७ स्मृतीदिन सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा, अंकुर बुद्धविहार नायगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योती तांबे यांच्या अध्यक्षतेखाली अंकुर बुद्ध विहार, नायगाव, दादर, मुंबई येथे संपन्न झाला.
सदर प्रसंगी सम्यक कला कोकण संस्थेचे अध्यक्ष भार्गवदास जाधव यांनी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्मृतीशेष गोविंद दादा म्हशीलकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले तर जेष्ठ कवी व महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी ज्योत प्रज्वलित केले तसेच गोविंद दादांचे सुपुत्र जगतपाल म्हशीलकर, महिला सचिव मीनाक्षी ताई थोरात व उपस्थित मान्यवरांनी आदर्शांच्या प्रतिमास पुष्पसुमन अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली.
सदर प्रसंगी धार्मिक विधी बौद्ध महासभेचे आधारस्तंभ व कवी/ गायक आदर्श बौद्धाचार्य संतोष जाधव गुरुजी व बौद्धाचार्य जगदीश कांबळे गुरुजी यांनी सुमधुर वाणीने पार पाडले तर सूत्रसंचालनाची धुरा संतोष जाधव व राजाभाऊ गमरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे चिटणीस मंदार कवाडे यांनी गोविंद दादांच्या जीवनपटावर टाकला, तदनंतर धम्मराज यशवंते व उपस्थित तीस-पत्तीस कलावंतांनी आपल्या गीतगायनातून गोविंद दादांना सूरश्रद्धांजली अर्पण केली.
सम्यक कोकण कला संस्था व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद दादांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घेण्यात आलेला आदरांजली कार्यक्रमावेळी कलावंतानी अंतःकरणाने स्वरश्रध्दांजली अर्पण करून डोळ्याचे पारणे फिटावे असा भावविभोर कार्यक्रम सादर केल्यामुळे उपस्थितांना दादांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले व सभागृह गहिवरून आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक कोकण कला संस्थेचे कार्याध्यक्ष भगवान साळवी, अध्यक्ष भार्गवदास जाधव, महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे, संघटक नरेश शिंदे, सुभाष सावंत, माजी सचिव चंद्रमनी घाडगे, धम्मप्रचारक अनिल यशवंते, उपाध्यक्षा मीनाक्षी ताई थोरात, सचिव मंदार कवाडे तसेच बौद्ध महासभेच्या सायलीताई ताम्हनेकर, संगम ताम्हनेकर, विद्याताई कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल बौद्ध महासभा, कार्यकारीणी, सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अंकुर बुद्ध विहार कमिटी, सम्यक कोकण कला संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कलावंत, संगीतकार, वाद्यवृंद तसेच उपस्थित धम्म बांधवांचे राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.