मनसेच्या दणक्यानंतर Amazon ची मराठीत सेवा सुरू; विक्रेत्यांसाठी मराठी भाषेची सुरूवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१४: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं Amazon ला मराठी भाषेमध्ये सेवा सुरू करण्यासंदर्भात इशारा दिला होता. मनसेच्या दणक्यानंतर आता Amazon नं आपल्या रिजनल नेटवर्कचा विस्तार करत मराठी भाषेत आपली सेवा सुरू केली आहे. कंपनीनं रविवारी यासंदर्भातील घोषणा केली. तसंच सध्या विक्रेते मराठी भाषेचा वापर करू शकतात असं Amazon कडून सांगण्यात आलं आहे. “मराठी भाषेत सेवा सुरू केल्यानं ई कॉमर्सद्वारे लाभ घेण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील लाखो व्यवसायिक, एमएसएमई, स्थानिक दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांना येणारा भाषेचा अडथळा आता दूर होईल,” असं कंपनीनं म्हटलं आहे. Amazon सध्या महाराष्ट्रातील ८५ हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांची नोंदणी आहे. अशातच मराठी भाषेत नोंदणी करुन आपलं खात सुरू करण्याच्या मिळालेल्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरं म्हणजेच कोल्हापूर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव या ठिकाणच्या लाखो विक्रेत्यांचा या सेवेचा लाभ घेता येईल. या नव्या सुविधेमुळे विक्रेत्यांना नोंदणी करण्यापासून, ऑर्डर मॅनेज करणं, इन्वेन्ट्री मॅनेज करणं अशी अनेक कामं मराठी भाषेतच करता येतील. वेबसाईटसोबतच मोबाईलवरील अॅपमध्येही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त Amazon नं मराठी भाषेत ट्युटोरियलदेखील उपलब्ध करून दिले आहेत.

कंपनीनं यापर्वी हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि इंग्रदी या भाषांमध्ये आपली सेवा देण्यास सुरूवात केली होती. “मराठी भाषिक विक्रेत्यांना मराठीत नोंदणी करणं आपल्या खात्यावर देखरेख ठेवण्यासारखा अनुभव देणं हा आमच्या २०२५ पर्यंत १ कोटी एमएसएमईला डिजिटल करण्याच्या संकल्पाच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे,” अशी प्रतिक्रिया अॅमेझॉन इंडियाचे एमएसएमई अँड सेलिंग पार्टनर एक्सपिरिअन्सचे संचालक प्रणव भसीन यांनी सांगितलं.

मनसेची मोहीम

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी भाषेत अ‍ॅप सुरू करावे. अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. त्यांनी तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले होते.


Back to top button
Don`t copy text!