प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्यावतीने अमर शेंडे होणार सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । फलटण । प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह तथा नवोदित लेखक अमर शेंडे यांचा वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीदिनी (दि.15 जुलै) विशेष सन्मान होणार असल्याची माहिती, स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी दिली.

शुक्रवार, दि.15 जुलै रोजी सायं.6:00 वाजता पुणे येथील एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशनच्या सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पार पडणार्‍या या समारंभात प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांना यंदाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानाचे वितरण होणार असून श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांचाही यावेळी विशेष सन्मान होणार असून याच समारंभात अमर शेंडे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमर शेंडे गेली वीस वर्ष वृत्तपत्र, साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेंडे यांच्या मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर आधारित ‘बाळशास्त्री’ हे चरित्र, ‘यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा’ या साहित्यकृती आजवर प्रकाशित झाल्या असून त्यांनी लिहिलेले महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने ‘मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट’ यांचे जीवन चरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे. साप्ताहिक लोकजागर दिवाळी अंक, विविध स्मरणिका, गौरव ग्रंथ आदींच्या संपादनातही शेंडे यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक विषयांवर अनेक नियतकालिकांमधूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. वाचनसंस्कृतीच्या समृद्धीसाठी त्यांच्या या योगदानाबद्दल अमर शेंडे यांचा हा विशेष सन्मान होणार असून याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!