दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२३ । नाशिक । नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरुपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहूल आहेर, राहूल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणारा काळ आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पोलीस हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रति निष्ठा बाळगून आपली व देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. लोकांच्या सेवेकरिता आपण पोलीस दलात रुजू झालो आहोत, शिस्तीत काम करीत असताना संवेदना जिवंत ठेवल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देऊ शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण मेडल असेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडतांना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे. त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
पोलीस महासंचालक रजनीश सेठ आपल्या मागर्दशनात म्हणाले, प्रशिक्षणार्थी आज आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचित व शोषित घटकास समान न्याय व संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे. असे पोलीस महासंचालक त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. १२२ (सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र हे १ ऑगस्ट, २०२२ पासुन सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या ३४९ पुरुष व १४५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असून १ प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकूण ४९४ पोलीस उपनिरीक्षक यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थी पैकी ८८% प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व १२% पदव्युत्तर आहेत, यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचनात दिली.
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, नाशिक महानगपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीक्षान्त संचलनात उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले कॅडेट…
अभिजीत भरत काळे: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप – ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच
रेणुका देवीदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप – ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच
रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रिल
प्रशांत हिरामण बोरसे : “एन.एम. कामठे गोल्ड कप” बेस्ट कॅडेट इन राफल अँड रिव्हॉल्वर
शूटिंग
अभिजीत भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर – बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप – बेस्ट कॅडेट इन लॉ
किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन – बेस्ट कॅडेट इन स्टडीज
किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच
दीक्षान्त संचालन समारंभानंतर नूतन शैक्षणिक संकुल, मोटर परिवहन विभाग इमारत, अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत कोनशिलेचे अनावरण आणि भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहूल आहेर, राहुल ढिकले, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर व अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
असे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे नूतन शैक्षणिक संकुल….
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई अंतर्गत 13 हजार 846 चौरस मीटर जागेत 79 कोटी 68 लाख 61 हजार 908 रुपयांचे नवीन शैक्षणिक संकुल व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 26 वर्ग खोल्या, 1 सायबर लॅब, 1 संगणक लॅब, 1 स्टाफ रूम, 1 कॉन्फरन्स हॉल असणार आहे. तसेच मोटर परिवहन विभाग इमारत, प्रवेशद्वार, टेहाळणी टॉवर, संरक्षक भिंत याप्रमाणे इतर पायाभूत सुविधा या शैक्षणिक संकुलात उपलब्ध होणार आहेत.