स्थैर्य, सातारा, दि.२३: कोरोनाचा डेल्टा संक्रमणातील कोणताही रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळलेला नाही. तिसर्या लाटेची चर्चा सुरू असली तरी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कटाक्षाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, राष्ट्रीय आर्युविज्ञान कमिशनच्या तपासणी दौर्यानंतर नीट परीक्षा वेळेत झाल्यास यंदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्ष वैद्यकीय प्रवेश शक्य असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, सातारा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. संजय गायकवाड यांच्याकडून राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या तपासणी दौर्यासाठी पर्याप्त पायाभूत सुविधा व पदभरती यांची तांत्रिक प्रक्रिया राबविली जात आहे. सातारा सिव्हिल हॉस्पिटलची मुख्य इमारत व जंबो हॉस्पिटलचा विस्तारीत भाग मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. पुणे, मिरज, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहयोगी प्राध्यापकांना नेमणूक देण्यात येणार असून सातार्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडूनही विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. पानमळेवाडी येथे भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या इमारतीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग, प्रात्यक्षिक वर्ग, वसतीगृह,ग्रंथालय यांचे विकसन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या तपासणी अहवालाच्या निकषाप्रमाणे नीट परीक्षा वेळेत झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात राबविणे शक्य असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वर येथील वटवाघळांमध्ये निपाह रोगाचे विषाणू आढळल्याचा अहवाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, वटवाघळातून माणसांमध्ये या विषाणूचे संक्रमण होण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे , मात्र त्यासाठी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. शक्यतो ज्या भागात वटवाघळांचे प्रमाण जास्त आहे, तेथील वावर शक्यतो टाळावा. राष्ट्रीय विज्ञान वैद्यकीय परिषदेने अद्याप या संक्रमण रोगासंदर्भात अद्याप कोणतेही निर्देश आले नसल्याचे शेखरसिंह यांनी सांगितले. याशिवाय कोरोनाचा डेल्टा संक्रमणातील कोणताही रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळलेला नाही. त्यामुळे तिसर्या लाटेची चर्चा सुरू आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कटाक्षाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.