कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकारी शंभरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि. १४: कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. आता कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत श्री.शंभरकर यांनी सूचना दिल्या.

बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश शशिकांत मोकाशी, पोलीस उपायुक्त दिपाली घाटे, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले, ॲड. विलास शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेले बालक आजअखेर 516 असून यापैकी 53 माता तर 443 पितांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली 21 मुले आहेत. या बालकांसोबत पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा. 516 बालकांपैकी 391 बालकांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित सर्व बालकांचे अर्ज भरून घेऊन त्यांना त्वरित लाभ मिळण्यासाठी अधिकच्या निधीची मागणी  करा. त्यांचे कायदेशीर पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करा. 21 बालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्यांच्या पालकांच्या मिळकत, संपत्ती, बॅँक डिपॉजिट यांची माहिती घ्या. जेणेकरून नातेवाईक त्यांना त्यापासून दूर ठेवू नयेत, यासाठी काळजी घेण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी दिल्या.

तसेच विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे 20 हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.

बैठकीत अनाथ झालेल्या बालकांचे पुनर्वसन, परस्पर दत्तक जाऊ नये, मिळकतीवर नावे नोंदविण्याविषयी चर्चा झाली.

पालकांची संपत्ती, मिळकत, बँक डिपॉजिट, वारस प्रमाणपत्र याबाबत जिल्हा न्यायालयातर्फे कोअर ग्रुप करण्यात आला असून त्याद्वारे मदत करण्यात येणार असल्याचे श्री. मोकाशी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बालगृहातील 92 कर्मचाऱ्यांपैकी 65 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 92 पैकी 50 जणांचे पोलीस तपासणी झाली आहे. विधवा महिलांचेही सर्वेक्षण सुरू असून त्यांनाही इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार पेंशन योजनामधून लाभ देण्यात येणार असल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

पालक गमावलेली बालके आणि विधवा महिला लाभांपासून कोणीही वंचित राहणार नाहीत, विधवा महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे असे श्री. शंभरकर  यांनी केले.

बालकांच्या समस्यांबाबत संपर्क क्रमांक

चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१०, अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बालकल्याण समिती ९४२३३३०४०१, विजय खोमणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ८६०५४५३७९३, आनंद ढेपे ९८८१४९०२२६, दीपक धायगुडे ७३८७२६७९२२, जयाप्रदा शरणार्थी ७९७२५५०४२३, शोभा शेंडगे ९६८९९५८६४५


Back to top button
Don`t copy text!