साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे – गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील


दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२१ | पुणे | राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले.

कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या चोविसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे,गिरीश बापट, आमदार सुनील शेळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी मंत्री बाळा भेगडे, मदन बाफना, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले आदी उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीत संत तुकाराम कारखान्याने चांगली प्रगती केली आहे, असे सांगून  श्री. वळसे- पाटील म्हणाले, सहकारामुळे राज्यातील गावांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली आहे. कठीण परिस्थितीत सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला आहे. संत तुकाराम कारखान्याने सातत्याने सभासदांच्या ऊसाला चांगला बाजारभाव देत कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या जीवनात परिवर्तन आणि परिसराचा कायापालट करण्यात मोलाचा हातभार लावला आहे.

सध्या जागतिक पातळीवर साखर व्यवसायास अनुकूल गोष्टी घडत आहेत. या संधीचा लाभ घेत आर्थिक उपन्न वाढवून कारखान्यांनी विस्तार केला पाहिजे, तसेच एकापेक्षा अधिक सहउत्पादनांची निर्मिती केली पाहिजे. कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन खर्चात कपात करावी आणि झालेल्या बचतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे,  कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमास माजी आमदार कृष्णराव भेगडे, शरद ढमाले, ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे आणि कारखान्याचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!