दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । एसटी कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय होत आहे, हे जरी खरे असले तरी हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कामगारांचा आहे. फलटणकर नागरिक एसटी कामगारांच्या संघर्षात बरोबर राहतील. हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना एसटी कामगारांच्या समस्या समजल्या पाहिजेत. फलटण आगारातील एसटी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी नागरिकांच्या मार्फत आपण मोठ्या भावाप्रामाणे सहकार्य करत असून यापुढेही मदत लागल्यास आपण मदत करू, असे आश्वासन सद्गुरू संस्था समुहाचे संस्थापक व फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले यांनी दिले.
फलटण तालुका संघर्ष समिती समिती व लढा विलीनीकरण समिती फलटण आगार यांच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी चारशे एसटी कामगारांना किराणामाल व धान्याच्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंची मदत केलेली आहे. त्याच्या वितरणाच्या आयोजित कार्यक्रमात भोसले बोलत होते. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, मोहनराव रणवरे, अशोकदादा भोसले, शरद सोनवणे, राजेंद्र नागटिळे, रामभाऊ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशातील अनेक राज्यात राज्य परिवहन मंडळ राज्य शासनाकडेच असून अत्यंत चांगले चालले आहेत तर मग महाराष्ट्रात असे का होत नाही असा प्रश्न अॅड. नरसिंह निकम यांनी विचारून जर महाराष्ट्रात एसटी महामंडळाचे विलीनीकरण झाले तर महामंडळ अजून फायद्यात चालेल. परंतु गेले तीन महिने एसटी कर्मचारी विलीनीकरणाचा दुखवट्याच्या माध्यमातून आंदोलन करत असून याकाळात जवळजवळ ८४ कामगारांना आपले जीवन संपवावे लागले असून शासन मात्र विलीनीकरणास ठाम नकार देत असल्याचे सांगून आता कोर्टाचा निर्णयाचा आधार कर्मचाऱ्यांना राहिला आहे.
तुम्ही आम्ही निवडून दिलेले सरकार असून जर सरकारने विलीनीकरण केले नाही तर या सरकारला जनता घरी घालवल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून मायबाप सरकारने त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी ॲड. निकम यांनी केली.
ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून जनतेच्या न्यायालयात कर्मचाऱ्याच्या बाजूनी कौल लागेल असे सांगितले व कर्मचारी संपावर असला तरी समाजातील माणुसकी संपावर गेली नाही, त्यामुळेच आज फलटणमधील नागरिकांनी एसटी कर्मचाऱ्यांना आपली छोटीशी मदत दिली असल्याचे सांगितले.
यावेळी रवींद्र फडतरे व एसटी कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. एसटी कर्मचारी श्रीपाल जैन यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र फडतरे यांनी आभार मानले कार्यक्रमास फलटण आगारातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.