दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । वाशिम । जिल्हयात पावसाळयाच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापनाचे काम यंत्रणांनी लोकांच्या सहभागातून प्रभावीपणे करावे. निती आयोगाने जिल्हयाचे मागासलेपण ओळखून जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे. मागासलेपण दूर करण्यासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात विकास कामे करतांना नागरीकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर द्यावा. अशा सूचना पालक सचिव तथा मनरेगा व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी दिल्या.
आज 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत, आकांक्षित जिल्ह्याचा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी श्री. नंदकुमार बोलत होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलीस अधिक्षक बचन सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. नंदकुमार यावेळी म्हणाले, पावसाळ्याच्या दिवसात वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते. या दरम्यान जीवित हानी टाळण्यासाठी नागरीकांनी कोणत्या उपययोजना कराव्यात यासाठी नागरीकांना लोकशिक्षण देऊन आवश्यक त्या पूर्व सूचना दयाव्यात. त्यामुळे जीवित हानी कमी होण्यास मदत होईल. शोध व बचाव पथके सज्ज असावी. पूरपरिस्थिती जर काही ठिकाणी निर्माण झाल्यास यंत्रणांनी सज्ज राहून मदतीसाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करुन द्यावे. पूरपरिस्थितीत ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावांसाठी पर्यायी रस्त्यांची सुविधा असली पाहिजे. तालुका नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत असावा. पूरात अडकलेल्या नागरीकांना पूरातून सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी गावातील तसेच तालुक्यातील पोहणाऱ्या व्यक्तींची यादी तयार असली पाहिजे. वेळप्रसंगी पोहणारी माणसे घटनास्थळी वेळेत पोहचून मदतीच्या कामी आली पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून निती आयेागाने जिल्ह्याचा समावेश मागास जिल्ह्यात केला असल्याचे सांगून श्री. नंदकुमार म्हणाले, जिल्ह्यात विविध योजनांची नियोजनातून प्रभावी अंमलबजावणी केल्यास गरीबी दूर होण्यास मदत होवून अनेक समस्या सोडविता येतील. शिक्षणावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. बालकांच्या व महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोणताही बालक कुपोषीत राहणार नाही यासाठी बालकाला व मातेला सकस आहार मिळाला पाहिजे यासाठी मातांना मार्गदर्शन करावे. मुलांची वजने व उंची नियमित तपासण्यात यावी. महिलांच्या हिमोग्लोबीनची तपासणी वेळोवेळी करुन त्यांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केल्यास बालक सुदृढ होवून मातांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास तसेच ॲमिनिया असलेल्या महिलांना देखील मदत होईल. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांची टिम तयार करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. यामधून निश्चितच बदल झालेला दिसणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येत असल्याचे सांगून श्री. नंदकुमार म्हणाले. सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे एकरी चांगले उत्पादन घेतले अशा प्रत्येक तालुक्यातील 2 शेतकऱ्यांची निवड करुन त्यांचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन इतर शेतकऱ्यांसाठी करावे. शेतकरी पारंपारीक शेतीकडून नवीन पध्दतीच्या शेतीचा अवलंब करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. उत्पादनात वाढ झाली तर शेतकरी देखील लखपती होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगारासाठी जिल्ह्यातील नागरीकांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घेवून रोहयो योजनेची नियोजनपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी. असे सांगून श्री. नंदकुमार म्हणाले, ज्या तालुक्यात रोजगारानिमित्त स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे, त्या तालुक्यात व संबंधित गावात रोहयोतून मजूरांना रोजगार उलब्ध झाला पाहिजे. ज्या तालुक्यात रोजगारानिमित्त स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे. त्या तालुक्यात व संबंधित गावात रोहयोतून मजूरांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. मनरेगाचा निधी आता वेळेत उपलब्ध होत आहे. मनरेगात 263 प्रकारची कामे आहेत. यातील काही कामातून कुटूंब लखपती होण्यात मदत होत आहे. या कामातून गरीबी संपवून प्रत्येक कुटूंबाला लखपती करण्याचे नियेाजन आहे. जिल्हयातील एखाद्या गावाची एखाद्या विभागाने निवड करुन त्या गावासाठी जीव ओतून काम केल्यास त्या गावाचे चित्र बदललेले दिसेल असेही श्री. नंदकुमार यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले, सन 2006 नंतर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबतची तयारी पूूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात शोध व बचाव पथके गठीत करण्यात आली असून यासाठी लागणारे आवश्यक साहित्य सेवाभावी संस्था तसेच यंत्रणांना देण्यात आले आहे. पावसाळयात वीज पडून जीवित हानी होवू नये यासाठी दामिनी ॲपचा वापर करुन वीज पडण्याबाबत पूर्व कल्पना देण्यात येत आहे. रोहयोतून विविध विकास कामे करण्यासोबतच रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. ग्रामस्थ तसेच लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणा पोहचून त्या योजनांची माहिती चांगल्याप्रकारे समजावून सांगतात का हे सुध्दा बघण्यात येणार आहे. जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे श्री. षण्मुगराजन यांनी सांगितले.
श्रीमती पंत यांनी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी बालक व मातांनी कोणता आहार घ्यावा याबाबत सहज सोप्या भाषेत मातांना मार्गदर्शन करण्यात येईल. रोहयोतून जास्तीत जास्त विकास कामे व रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी लाभार्थ्यांशी संवाद साधून प्रभावीपणे काम करण्यात येईल. असे त्या म्हणाल्या.
आपत्ती व्यवस्थापनाबाबतची माहिती सादरीकरणातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. शाहू भगत यांनी दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच आकांक्षित जिल्हयासाठी काम करणाऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देखील यावेळी दिली.