अलमट्टी धरण 75% भरलें.. सगळीकडे पावसाचा जोर वाढला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महापूराचे सावट गडद

स्थैर्य, कोयनानगर, दि. १६ : केंद्रीय जल आयोगाने मान्सून चालु होण्यापूर्वी  सर्व धरणात 10 टक्के पाणीसाठा असावा असे आदेश दिले दिले असताना कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने हे आदेश पायदळी तुडवले आहेत. कर्नाटक मधील अलमट्टी धरणात जुलै महिन्यातच 91.93 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 75 % भरले आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारया कोयना धरणात 43 टीएमसी पाणीसाठा आहे. हे धरण सुध्दा 36 % भरले आहे. येथून पुढे पडणारया मुसळधार पाऊसाचा विचार केल्यास जल पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.यामुळे पुन्हा एकदा महापूराची टांगती तलवार सातारा, सांगली ,कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रावर आहे.

कर्नाटक मधील अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. या धरणात जुलैअखेरपर्यंत 60 ते 65 टीएमसी साठा अपेक्षित असताना या ठिकाणी सध्याच 91.92 टीएमसी साठा आहे. दुसरीकडे  अलमट्टी धरणात सध्या पाण्याची सरासरी आवक सुमारे 70 हजार  क्युसेक प्रतिसेंकद असताना विसर्ग मात्र 36 हजार 130 क्युसेक आहे. त्यावरून धरणात झपाट्याने पाणी पातळी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच गेल्या महिन्याभरात या धरणातून पाणी कमी प्रमाणात सोडल्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कृष्णा आणि उपनद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हाहा:कार उडाला होता. कराड तालुक्यालाही फटका बसला. आतापर्यंतच्या पुराचे रेकॉर्ड मोडले गेले. या पुराच्या धक्क्यातून अद्यापही लोक सावरलेले नाहीत.  त्यातच यंदाही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नदीकाठावरील लोकांनी महापुराची धास्ती घेतली आहे. महापूर टाळण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार आणि  प्रशासकीय पातळीवरही नियोजन सुरू आहे. पुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर येथे बैठक घेऊनही चर्चा झाली. निवृत्त अभियंत्यासह अनेकांनी   जुलैअखेर अलमट्टी  धरणात जादा पाणीसाठा ठेऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.

कोयना धरणामध्ये सध्या 42.43 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.  धोम धरणात 6.23 टीएमसी पाणीसाठा असून  साठवण क्षमता 13.50 टीएमसी, कण्हेर धरणात 3.89 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टीएमसी आहे. उरमोडी धरणात 5.92 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टीएमसी, तारळी  धरणात 2.35 टीएमसी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टीएमसी आहे.   कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 14.91 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 4.81 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टीएमसी आहे. 34.40 टीएमसी क्षमतेचे चांदोली धरणात 19 टीएमसी भरले आहे.

दरम्यान,  कोयना धरणातून 2 हजार  167    क्युसेक विसर्ग गेल्या महिन्याभरापासून आहे. चांदोली धरणातून 1 हजार 255, कण्हेर 24, दूधगंगा 600, राधानगरी 1 हजार 450, कासारी 250, उरमोडी 300 क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कमी कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास महापूर पुन्हा येेण्याचा धोका नाकारता येत नाही.

दोन्ही राज्यांची चर्चा होऊनही  पाणीसाठा जादा 

अलमट्टी धरणातील पाणीसाठा, विसर्ग याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकिहोळी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा झाली. तरीसुद्धा आताच पाणीसाठा 92 टीएमसी आहे.  ऐनवेळी पाणी वाढल्यानंतर महापुराचे नियोजन कसे होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

कोयना धरणात सध्या 43 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाच्या पायथा विज गृहातून 2,100 कूसेस्क्स पाण्याचा विसर्ग 1 जून पासून चालूच आहे. आतापर्यंत 6.62 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.धरणात 73 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. धरणात 30 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर पाणी सुटणार आहे.तर कर्नाटकचे अलमट्टी धरण भरायला सुध्दा 30 टीएमसी पाणीसाठय़ाची गरज आहे. दोन्ही धरणातून एकाचवेळी पाणी सुटले तर पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता आहे.

 

याबाबत जलतज्ञ निवृत्त अभियंता तथा वडनेरे समितीचे माजी सदस्य प्रदीप पुरंदरे यांच्याशी संपर्क साधला असता सगळ्या धरणात कोणत्या वेळी किती पाणीसाठा असावा ? याबाबत ‘ डी ‘ पध्दतीचा वापर करण्यात आला आहे. या ‘ डी ‘ पध्दती त कोयना धरणात सध्या असलेला पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे कोयना धरणाबाबत प्रश्न येत नाही. कर्नाटक मधील अलमट्टी धरणात जादा पाणीसाठा असेल तर त्यांनी पाणी सोडणे हे हितावह आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!