उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जमीन मोजणीसाठीच्या अत्याधुनिक रोव्हर युनिटचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । पुणे । महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास जमीन मोजणीसाठीच्या अत्याधुनिक ३५ रोव्हर युनिट व २ प्लॉटरचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप व कार्यान्वयन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२०२१ या आर्थिक नियोजन वर्षातील नाविन्य पूर्ण योजनेतून एकूण २ कोटी ९९ लाख रुपये रोव्हर युनिट व प्लॉटर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. १ रोव्हर युनिटची किंमत अंदाजे ८ लक्ष ३० हजार रुपये तर प्लॉटरची किंमत अंदाजे ४ लक्ष ५० हजार रुपये इतकी आहे. त्यातून ३५ रोव्हर व २ प्लॉटर खरेदी करण्यात आले आहेत.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री. मोरे यांनी जमीन मोजणीच्या पद्धती आणि उपयोगात आणलेल्या यंत्रांमध्ये वेळोवेळी झालेले बदल याची माहिती दिली.

रोव्हरमुळे मोजणीला मिळेल गती

रोव्हर यंत्र उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या सिग्नलद्वारे मोजणी करावयाच्या पॉइंटचे अक्षांश व रेखांश दर्शविते व त्या अक्षांश-रेखांश वरून ऑटोकॅड सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करूनमोजणीची पुढील प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या आधुनिक मोजणी साहित्यातून मोजणीकाम सुलभ, अचूक व अत्यंत जलदगतीने होण्यास मदत होईल.

यापूर्वीचे मोजणी साहित्य प्लेन टेबलने साधारण १० एकर मोजणी करण्यासाठी १ दिवस वेळ लागत असे. तसेच ई.टी.एस. यंत्राच्या साह्याने तेवढ्याच क्षेत्राच्या मोजणीसाठी ३ ते ४ तासाचा कालावधी लागत होता. आता सुमारे ३० मिनीट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तेवढी मोजणी शक्य होईल.


Back to top button
Don`t copy text!