आघाडी सरकार विधिमंडळाला घाबरणारे – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे टीकास्त्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करणारे महाविकास आघाडीचे सरकार हे विधिमंडळाला घाबरणारे सरकार आहे, अशी धारदार टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. भांडारी यांनी सांगितले की, कोरोना संकटातून हळूहळू सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. संसदेचे अधिवेशनही सुरु झाले आहे. मागील वर्षी आणि याही वर्षी केंद्राने कोरोनाचे कारण सांगून संसदेची अधिवेशने  गुंडाळली नाहीत. महाराष्ट्रातील आघाडी सरकार मात्र कोरोनाचे कारण सांगून विधिमंडळाची अधिवेशन अत्यल्प काळाकरिता घेऊन आपण विधिमंडळाला सामोरे जाण्यास घाबरत आहोत हेच दाखवून देत आहे. राज्य सरकार एकीकडे लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना आवाहन करत आहे, दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री मंत्रालयाबरोबर विधिमंडळात येण्याचेही टाळत आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन जवळ आले की नव्या विषाणूची चर्चा सुरु होते हा योगायोग नव्हे असा टोलाही त्यांनी लगावला.

नागपूरऐवजी मुंबईला विधिमंडळाचे अधिवेशन वारंवार घेणे हा नागपूर कराराचा भंग आहे. विदर्भ महाराष्ट्रात सामील होत असताना विदर्भातील जनतेला विधिमंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी नागपूरला घेण्याचे वचन ‘नागपूर करारा’द्वारे दिले गेले आहे. नागपुरात अधिवेशन न घेणे हा नागपूर कराराचा उघड उघड भंग आहे, असेही श्री. भांडारी यांनी नमूद केले.

आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त या सरकारच्या अपयशाचा पंचनामा करण्यासाठी राज्यभर भाजपातर्फे पत्रकार परिषदांचे आयोजन केले गेले होते. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषदांद्वारे आघाडी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडले, अशी माहितीही त्यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!