
दैनिक स्थैर्य । दि.०९ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात येथील ढोर गल्लीमध्ये सांडपाण्याच्या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची वर्कऑर्डर नसतानासुद्धा हे काम झाले आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष अशोक तपासे यांचे चिरंजीव अनिकेत तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तपासे पुढे म्हणाले, सांडपाणी गटाराचे कोणतेही वर्क ऑर्डर नसताना ढोर गल्लीमध्ये करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तब्बल 46 लाख रुपयांचे आहे प्रत्यक्षात कामाची परिस्थिती पाहिली असता ते अवघ्या दहा लाख रुपयांचे आहे असे दिसून येते. यासंदर्भात पालिका प्रशासनाने जो अहवाल दिला त्यामध्ये टक्केवारीचा वास येत आहे. वर्कऑर्डर नसताना आम्ही थर्ड पार्टी ऑडिट करू असा खुलासा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केला आहे. कामाची परवानगी नसताना कोणत्या अधिकारात संबंधित वार्डचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी हे काम केले आणि त्याची कल्पना सातारा नगरपालिकेला नसावी हे आश्चर्यजनक आहे. संबंधित ठेकेदार व सातारा पालिकेचे अधिकारी यांच्या संगनमतातून केवळ भ्रष्टाचार करून मलिदा लाटण्यासाठी हे उद्योग सुरू असल्याचा आरोप तपास यांनी केला.
ढोर गल्ली येथील गटाराचे काम निकृष्ट असताना याचे बिल निघू नये. या कामामुळे सातारकरांच्या पैशाचा चुराडा होत आहे. वारंवार मागणी करूनही पालिकेने कोणतीही कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. या कामासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा पालिकेचा संबंध कसा काय पोचतो असा सवाल अनिकेत तपासे यांनी केला. हा प्रकार म्हणजे कागदोपत्री झालेला भ्रष्टाचार झाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कामाचे सारे अहवाल जुळवले जात असले तरी अत्यंत हीन दर्जाचे काम नगरसेवक करत आहे, पालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.