खासदारांकडून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप; दिगंबर आगवणेंची फलटण पोलीसांकडे तक्रार; तालुक्यात खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 01 मार्च 2022 । फलटण । माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे एकेकाळचे जिवलग मित्र असलेले फलटण तालुक्यातील युवा उद्योजक तथा युवा नेते दिगंबर आगवणे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप करत खासदारांसह कारखाना व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या प्रकारामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दिगंबर आगवणे यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, आपण गिरवी येथील रहिवासी असून आपला शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या कुटूंबियांच्या नावे मौजे गिरवी, वाठार निंबाळकर, सुरवडी, नांदल आणि पिंपळवाडी या गावी शेती आह. शेतीबरोबरच लाकूड विक्री आणि ब्रिकेट तयार करुन कंपन्यांना विकण्याचा आपला व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून सन 2007 साली आपला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या सुरवडी येथील तत्कालिन स्वराज दूध डेअरीसाठी आपण लाकूड पुरवठा करत होतो. तेव्हापासून आपले त्यांच्याशी आर्थिक व्यवहार होत होते.

त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्याला त्यांच्या उपळवे येथील स्वराज कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदाचे अमिष दाखवून आर्थिक मदतीची विनंती केल्यामुळे आपण सन 2014 साली आपली मौजे पिंपळवाडी येथील सर्व्हे नं. 64/4, क्षेत्र 1.62 हेक्टर ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा पुणे कॅम्प) यांच्याकडून 50 कोटी, बँक ऑफ इंडिया (शाखा पुणे) यांच्याकडून 47.13 कोटी आणि कॅनरा बँक यांच्याकडून 45 कोटी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साखर कारखान्यास कर्ज मिळण्याकरीता गहाण ठेवली. ऑक्टोबर 2014 मध्ये नमूद कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदावर आपली नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले परंतू कारखान्याच्या व्यवहारात आपण कार्यरत नाही. कारखान्याचे बांधकाम पूर्ण जाल्यानंतर डिस्टलरी प्रोजेक्टसाठी पुन्हा वरील जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा पुणे कॅम्प) मध्ये गहाण ठेवून 84 कोटी कर्ज असे एकूण 226 कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तन्हिी बँकेच्या संमतीने काढले आहे.

त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांचा स्वराज इंडिया अ‍ॅग्रो हा साखर कारखाना सुरु झाल्यानंतर वीज निर्मितीबाबत तोंडी व्यवहार करुन सिझन चालू असताना निर्माण झालेली विज ही कारखान्यासाठी आणि ऑफ सिझन काळातील वीज महावितरणला विक्री करुन येणारे उत्पन्न दोघात वाटून घेण्याचे ठरले होते. त्यावेळीही त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने स्टेट बँक ऑफ पटीयाला, शाखा वाडे फाटा, सातारा मध्ये मौजे फलटण या गावातील बिनशेती सर्व्हे नं.82/9, 82/15 तसेच नांदल, गिरवी येथील जमीन तारण ठेवून आपण 2.5 कोटी रुपये कर्ज काढले. नमूद रक्कमेतील 2 कोटी रक्कम ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा गिरवी येथील आपल्या बँक खात्यावरुन आपण रणजितसिंह निंबाळकर यांच्या खात्यावर दि.20/1/2015 रोजी जमा केली आहे. त्यानंतर दि.19/5/2015 रोजी याच बँकेतील दुसर्‍या खात्यावरुन आपण 60 लाख रुपये रणजितसिंह निंबाळकर यांच्या खात्यावर जमा केले आहेत. असे एकूण 2 कोटी 75 लाख रुपये कर्ज या प्रकल्पासाठी आपण काढून दिले आहे.

त्यानंतर दि.20/11/2017 रोजी आपल्या आयुर ट्रेडर्स कंपनीच्या अभ्युदय बँकेच्या खात्यावरील 65 लाख रुपये रक्कम रणजितसिंह निंबाळकर यांच्या स्वराज अ‍ॅग्रो कारखान्याच्या खात्यावर बगॅस खरेदीसाठी आपण पाठविले. परंतू आजअखेर आपल्याला त्या मोबदल्यात बगॅस मिळालेले नाही. रणजितसिंह निंबाळकर यांनी नमुद कारखान्यातील बगॅस आणि मळीची विक्री कदाखवून आपल्या कारखान्याची उलाढाल आणि फायदा दाखवण्यासाठी आपल्याला 7-8 कोटीची खोटी बिले देवून माल विक्री केल्याचे दाखवले. दि.31/8/2018 रोजी आपली आयुर ट्रेडर्स ही कंपनी जळून खाक झाल्यानंतर खोट्या बिलाचा माल माझ्या कंपनीत दाखवून विमा क्लेम करण्यासाठी रणजित निंबाळकर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपही दिगंबर आगवणे यांनी केला आहे. मात्र बिले खोटी असल्यामुळे आपण ती कंपनीकडे सादर केली नसल्याचेही दिगंबर आगवणे यांनी स्पष्ट केले आहे.

रणजितसिंह निंबाळकर यांनी ते चेअरमन असलेल्या स्वराज पतसंस्थेतून सन 2013 साली त्यांच्या पत्नी सौ.जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्याने आपल्या नावे कर्ज घेतले होते. पुढे सन 2016-17 साली त्यांनी याच पतसंस्थेमध्ये आपली सुरवडी येथील शेतसर्व्हे नं.48/2 ह्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे त्याच्यावर वहीवाट व बोझा दिसण्यासाठी केस चालू असताना रणजितसिंह निंबाळकर यांनी ही जमीन गहाण ठेवून 1 कोटी रुपये कर्ज घेतले होते. परंतु कर्ज प्रकरणात आपल्या सह्या घेवून सदरची रक्कम आपल्याला मिळालेली नाही. त्यापैकी परस्पर 59 लाख रुपये कर्ज पतसंस्थेमध्ये कारखान्याने भरल्याचे आपल्याला समजले आहे. सदर कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह निंबाळकर यांनी या पतसंस्थेद्वारे कलम 138 एन.आय.अ‍ॅक्टप्रमाणे कोर्टात दावा दाखला केला असल्याचेही दिगंबर आगवणे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

या सर्व प्रकरणांवरुन रणजितसिंह निंबाळकर, स्वराज इंडिया अ‍ॅग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्‍वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतानाच रणजितसिंह निंबाळकर विद्यमान खासदार असल्याने त्यांच्याकडून पदाचा गैरवापर करुन आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता असून त्यांच्यापासून आपल्या जिवीतास धोका आहे, असेही दिगंबर आगवणे यांनी आपल्या अर्जात शेवटी नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!