
दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । सातारा । नागठाणे(ता.सातारा) येथील विकास सेवा सोसायटी नं.१ वर केलेले आरोप हे त्यांनी दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीवरूनच केले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे माजी सरपंच विष्णू साळुंखे यांनी म्हटले आहे.
निवेदनात त्यानी म्हटले आहे की, प्रथम मी सेवा सोसायटीचे आभार मानतो की त्यांनी पत्रकार परिषदेत मी अपुऱ्या माहितीच्या आधारावर आरोप केले आहेत असे म्हटले आहे. त्यांचे सांगणे बरोबर आहे. कारण त्यांनीच मी मागितलेल्या माहिती अधिकारात मला अपुरी माहिती दिली आहे. सोसायटीने जर मला पूर्ण माहिती दिली असती तर त्यांचे पितळ उघडे पडले असते. सोसायटीवर केलेले ३५ ते ४० लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप हे त्यानीच माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून केला आहे. एक प्रकारे त्यांनी अपुरी माहिती मला दिल्याचे पत्रकार परिषदेत मान्य केले.
सोसायटीच्या इमारत बांधकामास जिल्हा उपनिबंधकांकडून ६२.३० लाख रुपयांचा मंजुरी आदेश संस्थेस मिळाला असतानाहीं संस्थेने ठेकेदार व्ही.एच.साळुंखे यांची ६५.६३ लाखांची निविदा मंजूर केली. निविदा कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली याचा ऊलगडाही संस्थेने केला नाही. प्रत्यक्ष ऍडव्हान्स म्हणून ठेकेदारास ७९.१४ लाख रुपये देण्यात आले. संस्थेने स्वनिधी ४० लाख,जिल्हा बैंकेकडून ४० लाख, सोसायटी नं.२ कडून १२.१२ लाख व नवीन इमारतीतील गाळे विक्रीतून १०.७७ लाख अशी रक्कम जमा केली.जमा व खर्च रकमेचा ताळमेळ लागत नाही.
या इमारतीचे बांधकाम गावातील तथाकथित पुढाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केले. यात संस्थेचे कोणतेही हित जोपासले नाही. ज्यांनी बंगले बांधले त्यांना माहीत आहे की ते कसे बांधले? मी आजही पत्र्याच्या घरातच रहातो. काचेचे घर माझे नाही. सभासद व ग्रामस्थ यांना यामध्ये नेमके कोणाचे उखळ पांढरे झाले आहे हे लवकरच लेखा परीक्षण चाचणी झाल्यावर समजेल. यासाठी पाठपुरावा सुरू असून सदर प्रकरण जिल्हाध्यक्ष, आण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीकडेही दाखल केले असून ही समिती याचा पाठपुरावा करण्यास सक्षम आहे असेही त्यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.