
स्थैर्य, फलटण, दि. 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर कंपनीची बदनामी थांबवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागून, खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी के. बी. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संदिप मोहन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ ऑगस्ट रोजी आरोपीने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘के. बी. कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे,’ अशा आशयाचा बदनामीकारक मेसेज टाकला. याबद्दल जाब विचारण्यासाठी फिर्यादी त्याला भेटले असता, आरोपीने ही बदनामी थांबवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास कंपनी बंद पाडण्याची आणि मॅनेजमेंट टीमवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच, तात्काळ मेसेज थांबवण्यासाठी ३५ हजार रुपये मागितले. त्यानुसार, फिर्यादीने त्याला ३३ हजार रुपये रोख दिले. उर्वरित रक्कम न दिल्यास आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संदिप शिंदे यांच्या तक्रारीवरून, संशयित आरोपीविरोधात खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.