दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून सातारा तालुक्यातील सर्वच्या सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे सातारा तालुक्यातील मतदारांचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, सुरेश सावंत, लहुराज जाधव यांच्यासह प्रदीप विधाते, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, रामराव लेंभे आदी उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पॅनेलला सहकार्य केले त्यांचेही आभार मानण्यात आले. यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, गेल्या ५- ६ वर्षात बँकेचा चेअरमन म्हणून उल्लेखनीय कामकाज केले. सर्व सहकारी संचालकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झाले आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. बँकेचा इतिहास पाहता राजकारण विरहित कामकाज झाले आहे. राज्य आणि देशात आपल्या बँकेचे नाव अग्रेसर आहे आणि बँकेची घोडदौड कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आवश्यक आहे. सातारा तालुक्यातील मतदार विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सहकार पॅनेलच्या पाठीशी १०० टक्के खंबीरपणे उभे राहतील.
ना. पाटील, आ. मकरंद पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चेअरमन म्हणून उल्लेखनीय काम केलं आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या दूरदृष्टीने सातारा तालुक्यात सहकार क्रांती झाली आहे. त्यांच्या विचाराने जिल्हा बँकेचे कामकाज चालू आहे. बँक कशी चालली आहे हे सर्वांच्या समोर आहे. सभासद, शेतकरी हित जोपासताना कोरोना, दुष्काळ, पूरपरिस्थिती अशा आपत्कालीन परिस्थितीत बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून येतील हे सांगण्यासाठी कोना जोतिषाची गरज नाही. सर्वांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या पाठीशी उभे राहून सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. जेष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्हा परिषदेचे माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, किरण साबळे पाटील, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, सोनाली नलावडे, मनीषा काळोखे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, अरविंद जाधव, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, आशुतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, मिलिंद कदम, प्रकाश बडेकर, रामभाऊ जगदाळे, विक्रम पवार, सूत गिरणीचे उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, दादासाहेब बडदरे यांच्यासह सातारा तालुक्यातील सर्व मतदार, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.