दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । “चला जाणूया नदीला” अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सर्व संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर कार्यवाही करत समन्वय ठेवून माहिती गोळा करण्याचे काम करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणूया नदीला” या अभियानाविषयी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली. त्यावेळी श्री. खिलारी यांनी या सूचना दिल्या.
यावेळी सह सदस्य सचिव तथा अधिक्षक अभियंता, जलसंपदा संजय डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, यांच्यासह कृष्णा नदीचे समन्वयक प्रदीप पाटणकर, संदीप श्रोत्री, वेण्णा नदीचे समन्वयक प्रवीण पवार, बजरंग चौधरी, येरळा नदीचे समन्वयक प्रकाश जाधव, संपतराव पवार, जय कुलकर्णी, माणगंगा नदीचे समन्वयक वैजिनाथ घोंगडे, माधव पोळ, रुपेश कदम, अजित म्हसवड यांच्यासह समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.
चला जाणूया नदीला हे अभियान जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी म्हणाले, नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करून त्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे हा या अभियनाचा उद्देश आहे. त्यासाठी या नद्यांच्या क्षेत्रातील संपूर्ण माहिती गोळा करणे महत्वाचे आहे. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित तालुक्यांचे तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विविध यंत्रणा यांना पत्र पाठवून तातडीने माहिती गोळा करावी. ही माहिती नदी समन्वयकांना देण्यात यावी. त्या अनुषंगाने नदी समन्वयकांनी अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू करावी. दुसऱ्या टप्प्यामध्ये जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी सह अमृत रथ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजनही हाती घेण्यात यावे, असेही श्री. खिलारी यांनी सांगितले.
सुरुवातीस समितीचे सह सदस्य सचिव तथा अधिक्षक अभियंता, जलसंपदा श्री. डोईफोडे यांनी या अभियानाची माहिती देताना कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. तसेच करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजनही संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केले.
यावेळी माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशिय संस्थेने माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या कामाविषयीची चित्रफित दाखवण्यात आली.