दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । वाई । हरिहरेश्वर सहकारी बँकेमध्ये ३७ कोटी ४६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. संबंधित आरोपींनी संगनमताने करोडो रुपयांचा अपहार करून पैसे कुठे दडवूनन ठेवले आहेत. कुठे गुंतविले आहेत, याची माहिती घ्यायची आहे. त्यांच्या मालमत्तांची आणि ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती घ्यायची आहे असा युक्तिवाद सरकार पक्षाने केल्यानंतर न्यायालयाने नंदकुमार खामकर व इतरांना सात दिवसाच्या पोलीस कोठडीत सुनावली आहे.
बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना मंगळवारी अटक केली आहे. रमेश ज्ञानेश्वर खामकर, ऍड. ललित सूर्यकांत खामकर, ऍड. अविनाश अशोक गाडे, तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे या सर्वांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुख्य संशयित बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर स्वतः सातारा येथील न्यायालयात हजर झाले होते. त्यानाही न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच बँकेचा सरव्यवस्थापक रमेश जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता संबंधित आरोपींच्या वकिलांनी हा बँकेचा घोटाळा हा कागदोपत्री आहे. आम्हाला न्यायालयाने जामीन द्यावा, थोडी मुदत द्यावी. आम्ही आमच्या मालमत्ता विकून बँकेचे सर्व पैसे भरण्यास तयार आहे. या कामी सर्व पुरावा व कागदपत्रे बँकेमध्ये उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणत्याही आरोपीला तपास कामासाठी पोलीस कोठडीची ची गरज नाही, असे निवेदन आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला केले. यावर सरकार पक्षाने आपली बाजू मांडताना सांगितले की, सदर आरोपींनी बँकेमध्ये संगनमताने करोड रुपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यातून जमा केलेली रक्कम कुठे गुंतविली आहे, कुठे दडवून ठेवली आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे. अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांच्या कागदोपत्री फेरफार करून त्यांनी बँकेची फसवणूक केली आहे. या आरोपींच्या व इतर संचालकांच्या मिळून २२ वाहने आणि ५५ मिळकती आहेत. यातील वडिलोपार्जित व यांनी विकत घेतलेल्या मिळकती किती आहेत याचीही माहिती घ्यायची आहे. हा सर्व जनतेचा व गुंतवणूकदारांचा पैसा आहे. याचा सखोल तपास करावयाचा आहे. हा गुन्हा घडण्याआधी व व नंतर त्यांनी घेतलेल्या मालमत्तांची माहिती घ्यायची आहे. संबंधित आरोपी नंदकुमार खामकर व इतर यांची रिझर्व बँकेशी ही संबंधित संचालक मंडळ नोंदणीकृत आहे. नंदकुमार खामकर यांनी रिझर्व बँकेला शपथ पत्र दिले आहे,की सगळे पैसे मी वापरले आहेत. यामध्ये इतरांचा काही संबंध नाही. यापूर्वीच बँकेचा सरव्यवस्थापक रमेश जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपींकडून माहिती घ्यायची असल्याने संबंधितांना पोलीस कोठडी दिल्याशिवाय त्यांच्याकडून तपास करता येणे शक्य नाही, अशी न्यायालयाला सरकारी वकील मिलिंद ओक यांनी विनंती केली. त्यानंतर सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता पोलिस कोठडीत कोणती नवीन माहिती निष्पन्न होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.