दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । रत्नागिरी । अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. तथापि तो पडणार नाही असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग व सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा विकास विषयक कामांच्या विभागनिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अमोल ओठणकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या बाबतीत क वर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने धर्मशाळा व सभागृहाची उभारणी करण्यात यावी तसेच सध्या नगरपालिकेची जी कामे सुरू आहेत ती संबंधितांनी पूर्णत्वास न्यावीत. संबंधित यंत्रणांवर टाकण्यात आलेली जबाबदारी त्यांनी पूर्णतः पार पाडावी.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा नियोजनमधून जिल्ह्याच्या विकास कामांकरिता ३०० कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून त्यापैकी ६० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातील सुमारे १० कोटी रुपये विविध विकास कामांसाठी वितरीत करण्यात आले असून या ३०० कोटी रुपयांपैकी जिल्हा परिषदेकडे सुमारे ११७ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत सरासरीच्या २४% इतका पाऊस जिल्ह्यात झाल्याचीम माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली .
पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम, शैक्षणिक विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मेरीटाईम बोर्ड, फिशरीज, महावितरण, प्राणी संग्रहालय यासह जिल्ह्यातील इतर प्रलंबित विषयांचा आढावा घेतला. बैठकीसाठी सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.