दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२३ | फलटण |
गेल्या बर्याच वर्षांपासून फलटण शहरासह तालुक्यामध्ये परंपरेप्रमाणे एक शिवजयंती साजरी होत आली आहे; परंतु यावर्षी विविध कारणांमुळे शिवजयंती उत्सव समितीमध्ये दोन गट तयार झालेले आहेत. त्यामुळे यावर्षीचा शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी दोन शिवजयंती उत्सव समित्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य तमाम शिवप्रेमी यांची मागणी आहे की, फलटण शहरासह तालुक्यांतून परंपरेप्रमाणे एकच ‘शिवजयंती’ साजरी करण्यात यावी. त्यानुसार सोशल मीडियावर तालुक्यात एकच ‘शिवजयंती’ साजरी करण्यात यावी, अशा आशयाच्या विविध पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये शिवभक्तांनी जर एकच शिवजयंती साजरी व्हावी, असे वाटत असेल तर आपापसातील सत्ताकारण, राजकारण, गटतट या सर्व गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच लाडके आहेत. त्यांचा पराक्रम, धाडस, स्वराज्य या सर्वांचेच आपल्याला अप्रूफ वाटते. त्यांचे विचार, वारसा जपण्यासाठी मराठी माणसाने नेहमी एकत्र यायला हवे. त्यांचा जन्मदिवस एकत्रितरित्या दणक्यात साजरा केला पाहिजे.त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यामध्ये परंपरेप्रमाणे एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य शिवप्रेमी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करीत आहेत.