
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झाला असल्याचा आरोप करत, या विरोधात भूमिका ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक उद्या, सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता हॉटेल ऋतुराज येथे होणार असून, माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी सर्वपक्षीय नेत्यांना राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
याप्रकरणी माहिती देताना अनुप शहा यांनी, नगरपरिषदेच्या काही स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शहराच्या विविध प्रभागांमध्ये हजारो मतांचा घोळ घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या तयार करताना, काही अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर हा गोंधळ घातल्याचे शहा म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून, या विरोधात राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे, असे आवाहन शहा यांनी केले आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.