स्थैर्य, फलटण दि.१९: ओबीसी समाजातील शिक्षितांनी एकत्र येऊन समाजातील गरीब वर्गाला आर्थिक, सामाजिक, शिक्षण व शासन स्तरावर न्याय मिळण्यासाठी मदत करावी. यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सातारा जिल्हा निरीक्षक डॉ.अर्चना पाटील यांनी सर्व ओबीसी नेत्यांना केले आहे.
समाजगटांच्या वैयक्तिक लाभाच्या आणि अन्य योजनांसाठीही भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, स्कॉलरशिप आणि अनुसूचित जाती-जमातीच्या धर्तीवर अन्य सुविधा मिळवून देण्यासाठी राज्यघटनेंतर्गत तिसरी, चौथी आणि पाचवी सूची निर्माण करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण व हक्कासाठी सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवावी. देशात सर्व ओबीसी समाजाची मोट बांधून वंचितांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा ओबीसींचे नेतृत्व या समाजाच्या नेत्यांमधूनच पुढे यावे, अशी वंचित घटकांची मागणी असल्याचेही डॉ.अर्चना पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या मोठी आहे . महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360, तर देशात ओबीसी जातींची संख्या 3,744 इतकी नोंद केलेली आहे.
इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने 2,171 प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते. कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, मी, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती यामध्ये मोडतात. ओबीसी समाजातील अनेक जाती न्याय हक्कांसाठी अनेक वर्षे लढतायत परंतु त्यांना अजुन न्याय मिळाला नाही. ओबीसी समाजातील नेते कार्यकर्ते, संघटना हेच कारणीभूत आहेत. सर्वांनी मिळून आपल्यातील गरीब वर्गातील लोकांना आर्थिक दृष्ट्या व आणि त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ,त्यासाठी सर्वांनी ऐकत्र येऊन काम करावे, असेही डॉ.अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले.