स्थैर्य, औरंगाबाद, दि. २७: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दहा दिवसात १७०० रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दहावी आणि बारावीचे वर्ग आणि क्लासेस वगळता अन्य सर्व शाळा, क्लासेस बंद २८ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. यात आता पुन्हा १५ मार्च २०२१ पर्यंत वाढ करण्याचे आदेश शनिवारी काढले. शहराची स्थिती लक्षात घेऊन पुढील आदेश काढण्यात येणार असल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले.
शहरात काेरोना दुसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मनपा प्रशासक, पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्र येत शहरातील वर्ग दहावी आणि बारावी वगळता सर्व शाळांचे वर्ग, क्लासेस आणि कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्रकार परिषदेतही स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात तसे लेखी आदेश २३ तारखेला निघाले होते.
२८ फेब्रुवारी पर्यंत या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यानंतरही शहरातील रुग्णांच्या संख्येत घट नसल्याने २७ फेब्रुवारीच पुन्हा शाळा, क्लासेस आणि कॉलेजस बंदची मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. मात्र ऑनलाईन अभ्यास घेण्यास परवानगी असल्याचेही आदेशात म्हटले आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्ष मार्च महिन्यात असल्याने त्यांच्या भवितव्याचा विचार करुन या वर्गांना सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पाळावे लागतील सर्व नियम
दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने या वर्गांना सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसना काेरोना होऊ नये म्हणून घालून दिलेले सर्व नियम पाळावे लागणार आहेत. त्यात सर्वांनी मास्क वापरने, सुरक्षीत अंतर ठेवणे, नियमित सॅनिटायझर वापरने, विद्यार्थी आणि शिक्षकांची ऑक्सीमिटरने तपासणी करणे आदी उपाय योजना कराव्या लागणार आहेत.