दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । कोरेगाव । कोरेगावची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ही सुंदर व दर्जेदार होणार आहे. नवीन आराखड्यानुसार दोन मजले वाढविले जाणार असून, तेथे सर्वच शासकीय कार्यालयांना जागा दिली जाणार आहे. खातेप्रमुखांच्या निवासस्थानांसाठी जागा उपलब्ध आहे, अंतर्गत रस्ते मोठे केले जाणार आहेत. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
शहरातील रहिमतपूर रस्त्यावर सुभाषनगर येथे मॅफको कंपनीच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची सोमवारी सकाळी आ. शिंदे यांनी पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, नगरसेवक व कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिग्विजय वंजारी व ठेकेदार कंपनीचे बांधकाम पर्यवेक्षक मनोज फडतरे यांनी आराखड्याची माहिती दिली.
आ. शिंदे पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील अन्य तालुका मुख्यालयांच्या तुलनेत कोरेगावातील इमारत भव्य व विस्तारीत केली जाणार आहे. पूर्वी थोड्याच कार्यालयांसाठी जागा दिली जाणार होती, आता मात्र वन विभाग वगळता अन्य कार्यालयांना या इमारतीत जागा दिली जाणार आहे. इमारतीचे दोन मजले वाढविले जाणार असून, तिसर्या मजल्यावर सुसज्ज बैठक सभागृह उभारले जाणार आहे, त्यामध्ये सुमारे पाचशे लोक बसू शकतील, असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
खातेप्रमुखांसाठी निवासस्थाने उभारली जाणार असून, त्यासाठी अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत. मॅफको कंपनीच्या पाठीमागील शेतकर्यांनी रस्त्याची मागणी केली आहे, त्याबाबत लवकरच व्यापक बैठक घेतली जाईल, शेतकर्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल, असेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गणेश होळ, सिध्दार्थ बर्गे, अमरसिंह बर्गे, सागर दळवी, प्रशांत गायकवाड, गणेश धनावडे, तुषार चव्हाण, महादेव जाधव, चंद्रकांत बर्गे, प्रशांत पवार, विजय देशमुख, मनोज बर्गे, नरेश गायकवाड, किरण देशमुख, संदीप खिरे आदी यावेळी उपस्थित होते.