स्थैर्य, कराड, दि. ०५ : बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या येथील शाखेतील कर्मचारी बाधित सापडल्याने बॅंकेच्या शाखेतील सर्वच कर्मचारी क्वॉरंटाईन केले आहेत. आरोग्य यंत्रणा व पालिकेने शाखाही सील केली आहे.
दरम्यान, सातारा पालिकेतील महिला कर्मचाऱ्याशी त्या कर्मचाऱ्याचा विवाह ठरला होता. त्याचा बस्ताही काही दिवसांपुर्वी सातारा येथे झाला. त्याच बस्त्यातून कोरोनाचा प्रसार झाला असावा, असा यंत्रणेचा अंदाज आहे. विवाह ठरलेली संबंधित महिला कर्मचारी दोन दिवसांपुर्वी साताऱ्यात बाधित ठरली आहे. त्यांच्या संपर्कात आलेला कर्मचारीही आज (रविवार) पॉझीटिव्ह आला. त्यामुळे ते कोणाकोणाच्या सहवासात आले, त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
सातारा पालिकेतील महिला आरोग्य कर्मचारी व कराड मधील महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी जे बाधित आहेत त्या दोघांनी नातेवाइकांबरोबर सातारा मध्ये एका ठिकाणी लग्नाचा बस्ता खरेदी केला अशी माहिती मिळत आहे
महाराष्ट्र बॅंकेच्या येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयासमोर शाखेत संबंधित कर्मचारी कार्यरत आहे. तर विद्यानगर येथील कॉम्पलेक्समध्ये तो राहतो. तो बॅंकेतील कर्मचारी यांच्या संपर्कात आला आहे. त्यामुळे त्या शाखेचा सर्व कर्मचारी क्वारंटाईन केले आहेत. त्याशिवाय अलिकडच्या चार ते पाच दिवसात बॅंकेत किती लोक आले. त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात कितीजण आले, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दहावर पोचली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. नऊ जणांवर उपचार सुरू आहेत.
सातारा पालिकेतील कर्मचारी महिला यापूर्वी पॉझिटिव्ह आली होती. तिच्याशी संबंधीत कर्मचाऱ्याचा विवाह ठरला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बॅंकेचे कामकाज बंद ठेवून सॅनिटायझिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दोन दिवस बॅंक बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर जोपर्यंत बॅंक बदली स्टाफ देत नाही, तोपर्यंत शाखा चालू केली जाणार नाही, असे मुख्याधिकारी डांगे यांनी स्पष्ट केले.