दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । मुंबई । जी – 20 देशांच्या प्रतिनिधींची पुढील वर्षी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान होणाऱ्या विविध बैठका आणि कार्यक्रम यांचे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे केल्या.
या परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, उच्च आणि तंत्रशिक्षण सचिव विकास चंद्र रस्तोगी, आदिवासी विकास विभाग सचिव अनुपकुमार यादव, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.
मुख्य सचिव श्री.श्रीवास्तव यांनी सांगितले की, जी – 20 परिषदेदरम्यान होणाऱ्या विविध बैठका-कार्यक्रमांना येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे, औद्योगिक गुंतवणूक करण्यासाठी असलेल्या संधीचे आणि पर्यटन स्थळांची माहिती सादरीकरण करण्यासाठी नियोजन केले जावे. यासाठी उद्योग, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने साहित्य निर्मिती करावी. त्याचे विविध भाषेत भाषांतर करुन घ्यावे.
परिषदेतील कार्यक्रम, बैठका मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे होणार आहेत. या शहरांचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी विशेष प्रयत्न करावे. तसेच यासाठी पुणे आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने संबंधित ठिकाणी सर्व नियोजन करावे, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या.
या परिषदेसाठी येणारे प्रतिनिधी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात. त्यामुळे अशा स्थळांचा विकास, सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.