दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । औरंगाबाद । जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देश देत उद्योग विभागाचे प्रधान जिल्हा वार्षिक योजनेचा निधी सचिव विकास कामांवर खर्च करण्याचे निर्देश उद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव हर्षदीप कांबळे यांनी दिले.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सहायक जिल्हाधिकारी श्री.जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी शितल महाले तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून उपलब्ध झालेला निधी वेळेत खर्च करून विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या.
औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक विकासाचे विविध प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. ऑरिक सिटीमध्ये मोठे उद्योग येत असून गुंतवणूकीत वाढ होत आहे. कृषी आधरित प्रक्रिया उद्योग, महिलांना रोजगार, इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योगात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नाविन्यूपर्ण उपक्रमाची आखणी करावी असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांची माहिती पालक सचिव यांना दिली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान, स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, त्याचप्रमाणे उद्योग, कृषी सहकार आदि विभागाच्या प्रलंबित कामाचा आढावा घेतला.