दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारत सरकारचे डिजीटल हेल्थ इकोसिस्टीम (Digital Health Ecosystem) अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे डिजीटल हेल्थ रेकॉर्ड (Digital Health Record) बनविले जात आहे. या अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाचे आभा हेल्थ कार्ड (ABHA HEALTH CARD) (Ayushman Bharat Health Account ) बनविले जात आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी डिजीटल हेल्थ कार्ड तयार करुन घ्यावे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.
आभा हेल्थ कार्डमध्ये 14 अंकी नंबर असेल जो त्या व्यक्तीचा आभा आयडी क्रमांक असेल. प्रत्येक व्यक्तीचे आभा कार्ड काढल्यानंतर पुढीलप्रमाणे फायदे होतील. आभा कार्ड तयार झाल्यानंतर यापुढील कालावधीमध्ये त्या व्यक्तीचे डिजीटल हेल्थ रेकॉर्डची नोंद हेल्थ कार्डवर होईल. आभा नोंदणी क्रमांकाचा उपयोग शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध कार्यक्रम तसेच विविध योजना यांच्याशी लिंकींग करण्यासाठी होईल. नागरिक स्वत: नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनचे Healthid.ndhm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण आपला आभा आयडी (ABHA ID) काही वेळातच तयार करु शकतात. नोंदणी करण्यापूर्वी आधार क्रमांक, आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक यांची आवश्यकता आहे. जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य.केंद्रामध्ये नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन गेल्यास त्यांचे आभा कार्ड तयार करणेबाबत आरोग्य विभागास सूचित करण्यात आले आहे. आजअखेर जिल्हयातील आठ लाख नागरिकांचे आभा आयडी कार्ड तयार झालेले आहेत.
तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपले व आपले कुटुंबियांचे आभा हेल्थ आयडी कार्ड त्वरित तयार करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.