
दैनिक स्थैर्य । दि. ३१ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये नगरपरिषद व महसूल विभागाच्या माध्यमातून जी “अतिक्रमण – हटाव” मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. ती पूर्णतः बेकायदेशीर असून त्याला कोणतीही परवानगी नाही. या मोहिमेच्या विरोधात फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या मार्गदर्शखाली पुढील वाटचाल करण्याचे ठरवले आहे. यामध्ये फलटण शहरातील सर्वच व्यापारी वर्गाने “अतिक्रमण हटाव” मोहिमेच्या विरोधात उद्या रविवार दि. ०१ जानेवारी २०२३ रोजी फलटण बंदची हाक दिलेली आहे. यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून अतिक्रमण हटावच्या विरोधात असलेल्या मोहिमेस पाठिंबा द्यावा, असे आवाहन सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी केलेले आहे.
फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सर्व व्यापारी वर्ग एकत्रित आले होते. त्यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, तुकाराम गायकवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसीम मणेर, भाजपाचे जेष्ठ नेते रवींद्र फडतरे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.