स्थैर्य, फलटण, दि. ०२ : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यामुळे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी फलटण शहर व तालुक्यातील ८ गावे ही प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. या बाबत फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाला फलटण शहरातील बांधकामे बंद ठेवण्याची विनंती केली. त्या नंतर लगेचच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने फलटण शहरातील सर्व बांधकामे ही बंद राहतील व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कडून पुढील सुचना येईपर्यंत कोणीही नवीन किंवा जुनी बांधकामे सुरू करू नयेत असे निर्देश बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन शफिक मोदी यांनी केलेले आहे.