स्थैर्य, सातारा, दि. २५ : बामणोलीच्या डोंगररांगांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात. अनेक स्थानिक वयोवृद्ध या रानभाज्या शोधून आणून घरी बनवून खातात. या भाज्या आयुर्वेदिक व पूर्णपणे नैसर्गिक असतात. या भाज्यांबरोबरच इतर रानमेवाही रानातून मिळतो.
यामध्ये फळे, फुले असे अनेक उपयोगी घटक डोंगरातून मिळतात; परंतु सध्या रानअळंबीची रोहने डोंगरात अनेक ठिकाणी निघत आहेत. एकाच ठिकाणी अनेक आळंबी निघतात. त्याला रोहन म्हणतात. जून ते ऑगस्ट महिन्यात अशी आळंबी मोठ्या प्रमाणात निघतात. ही पूर्णपणे दुर्मीळ, नैसर्गिक व पौष्टिक असतात.
मान्सून पाऊस सुरू होऊन जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर डोंगर उतारावर, गवताच्या कुरणात, करवंदीच्या जाळीत तसेच वारुळाच्या ठिकाणी आळंबीची मोठी मोठी रोहने निघतात. अशा ठराविक जागा डोंगरात असतात तेथे दरवर्षी भरपूर प्रमाणात आळंबी निघतात. स्थानिकांना या जागा माहीत असतात. सकाळी लवकर जाऊन ती काढावी लागतात. आळंबी निघण्याची जागा भुसभुशीत झालेली असते. त्या ठिकाणी अनेकजण गेले तर पायाने ती जमीन टणक होऊन पुन्हा दुसर्या दिवशी त्या ठिकाणी आळंबी निघत नाहीत. त्यामुळे सकाळी आळंबी गुपचूप काढायची असा संकेत ठरलेला असतो.