दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२४ | फलटण | चैतन्य रुद्रभटे | तीस वर्षीय अक्षय जामदार यांच्या अपघातानंतर त्यांचा मेंदू मृत होणार असल्याचे म्हणजेच ब्रेन डेड होणार असल्याचे समजल्यानंतर जामदार कुटुंबीयांनी अक्षय यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे पाच जणांना जीवनदान मिळणार आहे. जामदार कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाने समाजासमोर आदर्श उभा राहिल्याचे मत व्यक्त केले जात आहे. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब रौप्य महोत्सवी रुग्णालय फलटण, आरोग्य मंडळ संचलित फलटण लाईफलाईन हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या मार्गदर्शनाने ही अवयवदानाची प्रक्रिया करण्यात आली आहे.
मालोजीनगर (कोळकी) येथील अक्षय राजेंद्र जामदार या ३० वर्षीय युवकाचा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदी-पंढरपूर महामार्गावर पुण्याहून फलटणकडे येताना काळज ते बडेखानच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात अक्षयच्या मेंदूला जबरी मार लागल्याने त्याचे ब्रेनडेड होणार असल्याचे उपचाराअंती स्पष्ट झाले. प्रयत्नांची शर्थ करुनही मुलाचे प्राण वाचू शकणार नाहीत, याची कल्पना डॉक्टरांनी जामदार कुटुंबीयांना दिली. तरुण वयात एकुलता एक मुलगा गेल्याचे दुःख जामदार कुटुंबियांवर कोसळले असताना देखील इतरांचे प्राण वाचावेत म्हणून अक्षयच्या अवयवदानाचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब रौप्य महोत्सवी रुग्णालय, फलटण आरोग्य मंडळ संचलित फलटण लाईफलाईन हॉस्पिटल प्रा. लि., यांनी मार्गदर्शन केल्यानंतर अक्षय जामदार यांच्या अवयवदानाची पुढील प्रक्रिया पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे करण्यात आली. यावेळेस अक्षय यांचे दोन डोळे, दोन किडणी आणि एक लिव्हर दान करण्यात आली आहे. यामुळे पाच जणांना जीवनदान मिळणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
अक्षय यांची आई सौ. संगिता जामदार या कोळकी येथे अंगणवाडी सेविका आहेत. तर वडील राजेंद्र जामदार हे एका कापड दुकानात काम करत. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या या कुटुंबाचा विशेषतः अक्षय यांच्या आईचा अंगणवाडीच्या माध्यमातून मालोजीनगर (कोळकी) परिसरात घरोघरी सलोखा आहे. अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अक्षय यांच्या आई जामदार बाई म्हणून सर्वत्र परिचित आहेत. एकलुत्या एक मुलाचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्यावर आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अक्षय यांच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.