अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचारांचा पराभव – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२३ । नांदेड । बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचारांचा हा पराभव असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. अक्षयच्या पीडित कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय तरतुदीनुसार केंद्र सरकारच्यावतीने पीडित कुटुंबियांना ८ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली.

           केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजसुधारक महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा प्रत्येक नागरिकाने अधिक जबाबदारीने जपायला हवा.

जाहीर केलेल्या मदतीतील ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी पीडित कुटुंबियांकडे हस्तांतरीत केला. या भेटीनंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देशही दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, सत्येंद्र आऊलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पीडित कुटुंबाला पुन्हा आत्मविश्वास देऊन उभे करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनानेही शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या तरतुदीप्रमाणे सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. आजही या गावात जे कुटुंब भयाच्या सावटाखाली राहत आहे त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था होते का हे तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. या गावात पिडित व भयाच्या सावटाखाली जर कोणी कुटुंब असतील तर त्यांचे पुनर्वसनही होणे गरजेचे आहे. यादृष्टीने सिडको, मनपाची घरे अथवा बाहेरगावी त्यांच्या निवाऱ्यासाठी नियमाप्रमाणे उपलब्धतेप्रमाणे ३३ बाय ३३ आकाराचा प्लॉट / जागा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. प्लॉट / मनपाची घरे, सिडकोची घरे यापैकी ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे जे शक्य असेल त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा, ही भूमिका सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून असून कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या गटातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, ही भूमिका आम्ही घेतली आहे. सर्वांनाच समान विकासाची संधी मिळावी, ही त्यामागची भूमिका आहे. महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी सर्व समाजात परस्पर न्यायाची असलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून सामाजिक सलोखा व एकात्मता वाढवण्यासाठी सर्वांनीच अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!